जयसिंगपूर : राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
राज्यामध्ये रक्तपेढ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार वारंवार होत असल्याच्या तक्रारी विविध निवेदनांद्वारे प्राप्त होत आहेत. यामध्ये थॅलेसीमिया रुग्णांना रक्त न देणे, त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्क घेणे, संकेतस्थळावर दररोजचा साठा न दर्शविणे, तसेच प्लाझ्मा रक्तपिशवीसाठी विहित रकमेपेक्षा जादा रक्कम आकारणे, अशा तक्रारी होत आहेत. राज्यात अशा प्रकारे गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. जादा आकारलेल्या प्रक्रिया शुल्काच्या पाचपट दंड केला जाणार आहे. यांपैकी जादा आकारलेले शुल्क रुग्णास परत केले जाणार असून, उर्वरित रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल. त्यामुळे वारंवार सूचनांचे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांचा परवाना अन्न, औषध प्रशासनाकडून रद्द करण्याचे आदेश आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिले आहेत.
------------
चौकट - रक्तदान करा : यड्रावकर
कोरोनाकाळातील राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून जनतेचे स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवदान देण्यासाठी दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी केले.