राजू कांबळे
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील भैरेवाडी येथील सुरेश जगन्नाथ खोत यांने तहसिलदार यांचेकडून प्रलंबित कामे करून देतो असे सांगून पाच लाख रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खोत याला अटक केली. लाचलुचपतच्या या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.तक्रारदार यांचे मामेभाऊ यांची सावे गावात जमीन आहे. जमिनीचे गट नंबरचे फेरफारमध्ये खाडाखोड करून त्यामध्ये चुकीचे गट नंबर नोंद केले आहेत. फेरफारमध्ये खाडा खोड करणाऱ्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी व पूर्ववत सातबारा व फेरफार दुरुस्त करून मिळावा म्हणून तक्रारदार यांचे मामेभाऊ यांचेसह त्यांचे सह हिस्सेदार यांनी तहसिलदार कार्यालयात येथे अर्ज दाखल केला होता. कामाचा पाठपुरावा तक्रारदार करीत होते.शाहूवाडी तहसिलदार यांचेकडे अर्जाची सुनावनी सुरु होती. अर्जाची सध्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी तक्रारदार तहसिलदार कार्यालय येथे विचारणा करण्यासाठी गेले असता तेथे तक्रारदार यांना सुरेश खोत भेटले. त्याने जमिनीचे प्रलंबित काम पूर्ण देतो त्या करिता तहसिलदार यांना पाच लाख रुपयाची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याची खात्री करून सुरेश जगन्नाथ खोत याला अटक करून त्याच्यावर शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला.