' इथं महादेवाचं देऊळ आहे.शाळेतून आले की मी रोज महादेवाला जाते. येतीस ना?'
' हो,जाऊ या की...घरात बसून काय करायचं? सुमाताई, स्वयंपाकातलं मला फारसं काही येत नाही पण रात्री काहीतरी करीन..'
' कर ना...'
सुमाताईबरोबर नीलिमा देवळांत गेली.तिथं एका मुलानं तिला बेल दिला.येता-येता सुमाताईनी नारळ,पेढे असंही काही घेतलं...' हे कशासाठी?' रात्री सांगते एवढंच ती बोलली.
‘नीलिमा,मुगाच्या डाळीची खिचडी कर...’
सुमाताईना विचारत नीलिमा खिचडीची तयारी करत असतानाच सुमाताईही काहीतरी करत होती.
जेवण, आवरा-आवर होताच सुमाताईन नीलिमाला म्हणाली,
' तुझ्यासाठी एक खोली बघितली आहे. उद्या सकाळी आंघोळ झाली की जाऊन कलश ठेवून येऊ या..सुटीच्या दिवशी थोडं थोडं सामान नेऊन लावू या. माझ्याकडं भरपूर जाताच सामान त्याचा तुला उपयोग होईल आणि तेवढा तुझा पैसा वाचेल. एकदा तुझं बस्तान बसलं की तुला मी तिकडं पाठवून मात्र तेही एका अटीवर...सणावारी तू आमच्यासोबत...!'
एका एकी स्वप्न बघितल्यासारखं बोलणाऱ्या सुमनताईंच्या गळ्यांत पडून नीलिमा रडू लागली.सुमाताईनी तिला मनसोक्त रडू दिलं. तिचं रडणं थांबेपर्यंत तिला जवळ घेऊन त्या तिच्या अंगावरून हात फिरवत होत्या. हुंदके थांबताच नीलिमाचा चेहरा वर करून आपल्या पदरानं पाण्यानं डबडबलेले तिचे डोळे पुसले.
' कां रडलीस? सांगावसं वाटत असेल तर सांग,नसेल सांगायचं तर न बोलतां शांतपणे झोप.पण मोकळी झालीस तर तुलाच बरं वाटेल.'
सुमनताईच्या जवळ बसलेली नीलिमा उठून बाथरूममध्ये गेली आणि दहा मिनिटांत परत येऊन सुमनताईच्या जवळ बसली.' तुम्हाला सांगावयाचं नाही तर कुणाला सांगायचं ?' असं म्हणून ती बोलू लागली,
नीलिमा पाचवी_ सहावीत असतानाच एका अपघातात तिचे आईवडील गेले. तिच्या काकांनी तिला सांभाळलं. नीलिमाच्या वडिलांकडं बराच पैसा असल्याची कुणकुण लागल्यानं त्या पैशांच्या आशेनं काकूनंही सांभाळण्याची तयारी दर्शविली. सुरुवातीला त्यानी तिचा चांगला सांभाळ केला. नीलिमा सज्ञान झाल्यावर. गोड बोलून,वेगवेगळी कारणं सांगून तिच्याकडून पैसा काढून घेतला.काकांनी तिचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर तुझा खर्च तू कर, असं सांगून तिच्याकडं दुर्लक्ष केलं...
' ताई,दुसरा आधार मिळेपर्यंत मी सगळं सहन केलं. आता मी आणलेलं सामान एवढंच माझं सामान ! माझं सगळं लुबाडणाऱ्या, काकूंचं माझ्याशी वागणं आणि तुमचं वागणं....तुम्ही मला आधार दिला नसता तर..?'
' मी तुला आधार दिला नाही तो तू मिळवलास पण आता काळजी करू नकोस.मी तुझ्या पाठीशी आहे.उद्या सकाळी जायचं आहे ना...तुझ्या स्वत:च्या घरात कलश ठेवायला.चल झोपू या...सुमनताईंच्या कुशीत नीलिमा निर्धास्तपणे झोपली.
' किती छान आहे गं...' घरात पाय ठेवताच नीलिमा बोलली.
' आवडलं ना...शेजारपण माझ्या ओळखीचा आहे. सगळं जवळ आहे. सर्व बघूनच मी हे दोन खोल्यांचं घर घेतलं. आतल्या खोलीतल्या नळाकडं हात करत सुमनताईनी बरोबर आणलेल्या सामानातला तांब्याचा नीलिमाच्या हातात दिला. एका पिशवीतले थोडे तांदूळ कपाटातल्या मधल्या कप्प्यात पसरले. नीलिमाला तो तांब्या त्यावर ठेवायला सांगितला. तिच्याकडून व्यवस्थित कलश पूजन करवले.सुमनताईनी काल दुर्वा,फुले, पेढे वगैरे कां घेतले त्याचा उलगडा नीलिमाला झाला. ' तुझ्या या पुढच्या आयुष्यात पेढ्याची गोडी येऊ दे 'कलशापुढं ठेवलेल्या पेढ्यातील एक पेढा नीलिमाच्या तोंडात घालत सुमाताई म्हणाल्या.
संध्याकाळी शाळेतून येताना त्यांच्याबरोबर एक शिपाई होता. घरी येताच सुमाताईनी काही खोकी शिपायासमोर ठेवली. नीलिमाच्या घराच्या किल्ल्या दिल्या. पत्ता सांगून ते सामान त्याला तिथं नेऊन ठेवण्यास सांगितलं नंतर दोन-तीन शिपाई नीलिमाच्या घरात काही ना काही नेऊन ठेवत होता.
चार-पाच दिवस नीलिमा सुमनताईंच्याकडं होती. त्या दिवसांत त्यांच्याकडून ती बरंच शिकली. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्या काही बोलत नसत. नीलिमानीही त्यांना विचारलं नाही.
' उद्या शनिवार सकाळची शाळा. दुपारी आपण तुझं घर लावू या ' सुमनताईनी नीलिमाला सांगितलं.
शनिवारी शाळेतून आल्यावर जेवण झाल्यावर सुमाताईनी रिक्षा बोलावली. काही पिशव्या रिक्षात ठेवल्या आणि नीलिमाला घेऊन त्या तिच्या घरी आल्या. शनिवार सकाळपासूनच त्या शांत-शांत होत्या.
' या पिशव्यात चार-पाच दिवस पुरेल असं सामान आहे. शेजारी डेअरी आहे.आजपासून तू तुझ्या घरात रहा.एका डब्यात संध्याकाळचं जेवण आहे. संध्याकाळी शिपाई येऊन तुझं सामान लावेल.घाबरू नको शिपाई खूप चांगला आहे काही लागलं तर त्याला सांग..' एवढं सांगून नीलिमाच्या घरातून सुमनताई गेल्या.
त्या गेल्यावर नीलिमानं दार लावून घेतलं. तिला त्यांच्या वागण्याचा अर्थच कळला नाही. सुमनताईनी ठेवलेल्या पिशव्यातलं सामान काढून भिंतीतल्या कपाटात ठेवून तिनं एक खोके उघडले. तिला लागणारी सर्व भांडी त्या खोक्यात होती.' कुठं काय ठेवावं' याचा विचार करत. स्वयंपाककट्ट्याच्या खाली ती भांडी लावत असतानाच दाराची कडी वाजली.
नीलिमानं दार उघडलं. शाळेचा शिपायाबरोबर गॅस कनेक्शन जोडणारा माणूस होता.