कोल्हापूर : डॉट. कॉम. रिंगला या बोलक्या बाहुल्यांनी तब्बल दीड तास बालकांसह पालकांना मनसोक्त, पोट धरून हसविले; तर फॅशन शो आणि सोबत डान्समुळे रविवारची सुटी बालकांसाठी पुन्हा एकदा अविस्मरणीय ठरली. निमित्त होते, ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे आयोजित ‘सत्यजित पाध्ये यांच्या पपेट शो’चे.राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात रविवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभीच सभागृहात सत्यजित पाध्ये यांनी आपला बोलका बाहुला ‘डॉट कॉम’ या डॉगच्या माध्यमातून स्टेजवर एंट्री करताच उपस्थित मुलांनी एकच जल्लोष केला. यावेळी त्याची छबी मोबाईलमध्ये उतरविण्याचा मोह अनेक पालकांना आवरता आला नाही.
डॉट कॉम जसा बोलू लागला, तसे मुलांना मोठे कुतूहल निर्माण झाले. त्याला पाहून मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर ‘रंगीला’ या बाहुल्याच्या माध्यमातून सत्यजित पाध्ये यांनी बोलक्या बाहुल्याचा इतिहास सर्वांसमोर मांडला. ही कला कशी आत्मसात करावी, त्यामधील बारकावे काय आहेत, याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. यासह जादूचे चित्र कसे बोलते, हा विशेष प्रयोग त्यांनी याप्रसंगी सादर केला.बाहुल्यांच्या माध्यमातून दाखवून कोणीही लहान-मोठे नसते, असा संदेश मुलांना देण्यात आला. आपण नेहमी टीव्हीवर असे बाहुल्यांचे शो पाहतो; मात्र आज प्रत्यक्षात हा कार्यक्रम पाहत आहोत, याचा आनंद क्षणोक्षणी मुलांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. बोलणाºया बाहुल्याने मुलांशी मनसोक्त गप्पा मारून मुलांना पोट धरून हसण्यास भाग पाडले. ‘लोकमत बाल विकास मंच’चा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने सभागृह तुडुंब भरले होते.डान्सने डोलविले...भालकर्स कला अकादमीच्या स्वराज्य पाटील, सार्थक भिल्लारी, विकास पोवार यांनी रंगत आणली; तर सर्वेश व नेहा (केडीसी ग्रुप)ने आपला नृत्याविष्कार दाखवून सर्वांना डोलविण्यास भाग पाडले.
फॅशन शोबोलक्या बाहुल्यांच्या खेळादरम्यान बालचमंूसाठी फॅशन शो या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.