समीर देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जातीभेदाच्या भिंती माणुसकीच्या लाटेपुढे जमीनदोस्त होतात. अशीच एक समृध्द परंपरा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत घडत आली आहे. माणुसकीचा धागा घट्ट करणारी ही परंपरा जपण्याचे कार्य दिगवडे (ता.पन्हाळा) येथील पवार आणि कोल्हापुरातील मणेर कुटुंबीयांनी सुरू ठेवले आहे.
दिगवडे येथील राजाराम पवार आणि कोल्हापुरातील खलीलशेठ मणेर यांची जगावेगळी मैत्री. या दोघांच्या मैत्रीमध्ये कधीच त्यांचा धर्म आड आला नाही. अशाच एका रमजानच्या महिन्यात खलीलशेठ यांना शुभेच्छा देण्यासाठी राजाराम पवार गेले. त्यांनी सोबत ५० पुरणपोळ्या आणि कटाची आमटी आणली होती. दोघांची गळाभेट झाली आणि पवार यांनी प्रेमाचा आग्रह धरला की तुमचा उपवास पुरणपोळीने सोडायचा. गहिवरलेल्या खलीलशेठनी राजाराम यांना मिठी मारली. उपवास सोडण्यासाठी केलेली पारंपरिक तयारी बाजुला सारली गेली आणि मित्राने आस्थेेने आणलेल्या पुरणपोळीचा आस्वाद घेत मणेर कुटुंबीयांनी रोजाचा उपवास सोडला.
काळाच्या ओघामध्ये राजाराम आणि खलीलशेठ यांचे निधन झाले. परंतु राजाराम यांचे चिरंजीव संतोष यांनी ही परंपरा कायम ठेवली. आजही रमजानच्या महिन्यात दिगवड्याहून पुरणपोळ्या आणि कटाची आमटी येणं चुकलं नाही आणि मणेर परिवाराचा उपवास पुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय सुटला नाही. पवार आणि मणेर परिवारातील हा वेगळा ऋणानुबंध निश्चितच अनुकरणीय आहे.
------------------------------------
रुग्णालयात असतानाही....
रसरशीत माणुसकीचे हे वेगळेपण जपणारी ही परंपरा यंदा खंडित होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. संतोष पवार हे आजारी असल्याने रुग्णालयात दाखल होते. हिदायत मणेर यांनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. काळजी घेण्यास सांगितले. परंतु संतोष जरी रुग्णालयात दाखल असले तरी दुसऱ्याच दिवशी मणेर यांच्या घरी ५० पुरणपोळ्या आणि कटाची आमटी पोहोच झाली. उपवासाची भूक माणुसकीने भागली.
------------------------------------
कोट
कोल्हापूर जिल्ह्यावर राजर्षी शाहू महाराजांचे संस्कार किती खोलवर रुजले आहेत याचे प्रत्यंतर या परंपरेतून होते. आमच्या वाडवडिलांची माणूसपण जपण्याची परंपरा आम्ही पुढे चालवू शकलो याचा अभिमान आहे. संतोष पवारसारख्या मित्राने त्यांच्या वडिलांच्या पश्चातही ही परंपरा सुरू ठेवली आणि जातीधर्मापेक्षा माणूसपण मोठे असल्याचे सिध्द केले.
- हिदायत मणेर, कोल्हापूर
------------------------------------
फोटो: २४ कोल्हापूर ०१
दिगवडे (ता.पन्हाळा) येथील पवार कुटुंबीयांनी पाठवलेल्या पुरणपोळी आणि कटाच्या आमटीने कोल्हापुरातील मणेर परिवाराचा रोजाचा उपवास सुटतो.