कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ व संघाच्याच गोकुळ शिरगाव येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याची सर्व प्रकारची खरेदी आता गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अधिकाराखालीच एकत्रित करण्याचा निर्णय संघाने सोमवारी घेतला. त्यातून अनावश्यक खरेदीला आळा बसेलच शिवाय संघाचे भांडवल गुंतून पडणार नाही असा दुहेरी हेतू आहे. संघात सत्तांतर झाल्यानंतर दूध उत्पादकांचे पैसे वाचविण्याचे जे अनेक प्रयोग सुरू आहेत, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
संघाने घेतलेला निर्णय चांगलाच आहे, परंतु त्याला कारण ठरले आहे ते पशुखाद्य कारखान्यांतील वादग्रस्त खरेदीचे. संघाची निवडणूक तोंडावर असताना पशुखाद्य कारखान्यात कच्च्या मालाची वादग्रस्त खरेदी झाल्याची तक्रार आहे. ही खरेदी संघाच्या तत्कालीन अध्यक्षांच्या तालुक्यातीलच अधिकाऱ्यांकडून झाल्याचे समजते. त्याची रक्कम काही लाखांत आहे. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यास अडचणी वाढतील म्हणून संघाच्या तत्कालीन मातब्बर नेत्याने त्यावर पांघरूण घातले. सत्तांतर झाल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने या खरेदीबाबत शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाताला अजून तरी काही लागलेले नाही. परंतु, असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी पशुखाद्याची सर्व खरेदी प्रक्रिया आता गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या केबिनमधूनच झाली पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला.
महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना वर्षाला एक लाख २० हजार टनांचे पशुखाद्य तयार करतो. त्यामुळे त्यांना दरमहा किमान दहा ते १२ हजार टन कच्चा माल लागतो. पशुखाद्यासाठी मुख्यत: भातकोंडा, मका, राईस पॉलिश, मोहरी, सरकी आणि पामतेलाची पेंड हा माल लागतो. तो पंजाबपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व शेजारच्या कर्नाटकातून खरेदी केला जातो. आतापर्यंत या कच्च्या मालासह अन्य इंजिनिअरिंग विभागासाठी लागणारे साहित्यही स्वतंत्रपणे खरेदी केले जात होते. त्यामध्ये फारसा समन्वय नव्हता. म्हणजे पशुखाद्य कारखान्यास ६२०१ क्रमांकाचे बेअरिंग लागत असेल तर ते मागणीपत्र तयार करून खरेदी करत. हेच बेअरिंग गोकुळ डेअरीकडे आहे का याची चौकशी कधीच होत नसे. त्यामुळे अनेकदा गोकुळ डेअरीकडे काही माल पडून असे व त्याचवेळेला पशुखाद्य कारखान्याकडून त्याच मालाची खरेदी झाल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही खरेदीवर पूर्वीही व्यवस्थापकीय संचालकच सही करत असत. परंतु, त्या वेगवेगळ्या विभागातून होत होत्या. या सर्वाला आता लगाम बसणार आहे.
ऑनलाईन यंत्रणा
गोकुळसह सर्व युनिट व पशुखाद्य कारखान्याची खरेदी यंत्रणा ऑनलाईन विकसित केली जाणार आहे. म्हणजे औषधाच्या दुकानात जसे संगणकावर चेक केल्यावर कोणते औषधे किती प्रमाणात उपलब्ध आहे हे समजते, तसे लागणाऱ्या सर्व वस्तू संघाकडे किती प्रमाणात व कोणत्या शाखेकडे उपलब्ध आहेत याचीही माहिती एका क्लिकवर समजली पाहिजे, अशी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालकांनी दिल्या आहेत.