कोल्हापूर : शहरात कसल्याही प्रकारच्या साथीचे रोग पसरू नयेत म्हणून औषध फवारणी करण्यासाठी महानगरपालिकेने चार ट्रॅक्टरवरील औषध फवारणीची स्प्रिंकलर मशीन घेतली असून, ती महापालिकेच्या ताफ्यात गुरुवारी दाखल झाली.
शहरात आतापर्यंत कर्मचाऱ्यांमार्फत हातपंपांद्वारे औषध फवारणी केली जात होती; परंतु मोठे रस्ते, पूरबाधित क्षेत्र यांमुळे सर्वत्र औषध फवारणीमध्ये मर्यादा येत होत्या. साथीचे रोग पसरू नयेत म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्प्रिंकलरद्वारे औषध फवारणी करण्याकरिता ही अत्याधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री घेण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने स्वनिधीतून यासाठी ३० लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. ही २७ एच.पी.ची स्प्रिंकलर मशीन असून ती ट्रॅक्टरवर टाक्या व स्प्रिंकलरसह खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांचे उद्घाटन महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात गुरुवारी महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, गटनेता अजित ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, इस्टेट आॅफिसर सचिन जाधव, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते.कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात औषध फवारणीसाठी चार ट्रॅक्टरवरील स्प्रिंकलर मशीन घेतली आहेत.