कोल्हापूर : सोन्याचे उतरलेले दर आणि गुरुपुष्यामृत या योगावर गुरुवारी कोल्हापूरकरांनी सोन्या-चांदीच्या अलंकारांची खरेदी केली. यानिमित्त गुजरीसह ब्रॅन्डेड दागिन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होते.नव्या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत गुुरुवारी होता. त्यातच गेल्या पाच-सहा दिवसात सोन्याचा दर सातशे ते आठशे रुपयांनी कमी झाला आहे. गुरुवारी सोन्याचा दर ४९ हजार १०० रुपये १० ग्रॅम आणि चांदीचा दर ६७ हजार रुपये किलो असा होता, त्यामुळे नागरिकांनी चोख सोन्यासह विविध प्रकारच्या घडणावळीचे अलंकार खरेदी केले. सध्या लग्नसराई नसली तरी पुढील कार्यासाठी म्हणून दागिने बनवण्यासाठीची ऑर्डर दिली जात आहे.
मार्च-एप्रिलमध्ये लग्नसराई सुुरू होते. या काळातील तयारी म्हणून आताच अलंकारांची खरेदी होत आहे. चोख सोने घेतल्यानंतर त्यावर आणि दागिन्यावरही जीएसटी द्यावी लागते त्यामुळे अनेक ग्राहकांनी चोख सोन्याऐवजी लहान मोठ्या अलंकारांवर भर दिला आहे. यात कानातले, टॉप्स, ॲन्टीक ज्वेलरी, ठुशी, कोल्हापुरी साज अशा अलंकारांचा समावेश आहे, अशी माहिती चिपडे सराफचे मुरलीधर चिपडे यांनी दिली.