लोकमत न्यूज नेटवर्क
यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथील ‘आम्ही जांभळीकर’ ग्रुपमधील सदस्यांच्या निसर्ग संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून ऑक्सिजन पार्क या उपक्रमासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पार्कच्या सदिच्छा भेटीवेळी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिले.
निसर्गप्रेमाने भारावलेल्या आम्ही जांभळीकर ग्रुपच्या प्रयत्नाने ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली. हा ग्रुप आता ‘नावासाठी नाही... फक्त गावासाठी’ हे ब्रीद उराशी बाळगून अल्पकाळात अहोरात्र प्रयत्न करून विविध देशी वृक्षांचे रोपण करून जैवविविधता निर्माण करत आहे.
चार एकरामध्ये बाराशे विविध प्रकारची देशी झाडे लावण्यात आली असून, हा ऑक्सिजन पार्क आणखी सहा एकर जागेत करण्यात येत आहे. या ऑक्सिजन पार्कची प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यांमध्येही ऑक्सिजन पार्कची निर्मिती होत आहे.
गणपतराव पाटील यांनी स्वत:च्या गावाशी असलेले ऋणानुबंध व प्रेमापोटी सदिच्छा भेट देऊन येथील तरुणाईचं मनसोक्त कौतुक केलं. त्याचबरोबर ऑक्सिजन पार्कच्या पूर्णत्वासाठी सर्वप्रकारची मदत देण्याचे आश्वासन देऊन तातडीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून कुपनलिका खोदून दिली आहे.
निसर्ग संवर्धनासाठी आम्ही जांभळीकर ग्रुपने उचललेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद असून, इतर गावांनीही त्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
फोटो - ०२०६२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - जांभळी (ता. शिरोळ) येथील ऑक्सिजन पार्कला गणपतराव पाटील यांनी भेट देत पाहणी केली.