कोल्हापूर : महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रख्यात इतिहास संशोधकांनी आजपर्यंत केलेल्या संशोधनातून महाराणी ताराबाई यांची जन्मतारीख स्पष्ट झालेली नाही. असे असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशीच ताराबाई यांची जयंती असल्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करण्यामागे समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय इतिहास संशोधकांनी व्यक्त केला आहे. आंबेडकर जयंतीपासून मराठा समाज बाजूला जावा, यासाठीच हा उद्योग जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा संशयही व्यक्त होत आहे.
या संदर्भात नव्या पिढीतील इतिहास संशोधक डॉ. देविकाराणी पाटील यांनी सविस्तर विवेचन केले आहे. या विषयावर हा विकीपीडियामध्ये बदल कुणी केला? त्या व्यक्तीकडे या विषयाची काही संदर्भसाधने आहेत का? नेमकी १४ एप्रिल हीच तारीख शोधून काढण्यामागे नक्कीच काहीतरी कुटील हेतू दिसत असल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे. त्या म्हणतात, ‘महाराणी ताराबाईसाहेब या जगाच्या इतिहासातील महापराक्रमी स्त्री आहेत.
जगात राज्य स्थापन करणारी कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांचेच नाव घ्यावे लागते. अशा या महाराणीचा इतिहास अजूनही लोकांसमोर आलेला नाही. त्यांच्यासंबंधीच्या संशोधकीय घडामोडी या अलीकडील ७० ते ८० वर्षांतील आहेत. या विषयावर सखोल संशोधन करणारे डॉ. अप्पासाहेब पवार, रंगूबाईसाहेब जाधव-भोसले, ब्रिज किशोर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार किंवा तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत असतील, यांपैकी कुणालाही ताराबाईसाहेबांची जन्मतिथी ही कोणत्याही संदर्भसाधनांत मिळून आलेली नाही.
‘महाराणी ताराबाईसाहेबांचे निधन हे १७६१ साली सातारच्या किल्ल्यावर झाले आणि त्यांचा दहनविधी हा त्यांचे नातू रामराजे त्यावेळी सातारा गादीवर होते यांनी संगममाहुलीला केला. दहावा दिवस करताना त्यांनी एक सनद दिली; त्यामुळे महाराणी ताराबाईसाहेबांची निधनाची तिथी व दिवस हा समजला. त्या वेळच्या कागदपत्रात ताराबाईसाहेबांचे वय ८६ नोंदविले आहे. म्हणून याचाच अर्थ त्यांचा जन्म हा १६७४-७५ साली झाला, असे संशोधकांनी सुसंगत तर्काच्या आधारे मांडले; पण आजपर्यंत त्यांचा जन्म हा अमुक तारखेलाच या ठिकाणी झाला, असे कुठल्याही संदर्भसाधनात किंवा बखरीतही किंवा इतरही कुठेही लिहिले गेलेले नाही.’विकीपीडिया म्हणजे संदर्भसाधन नव्हेमहाराणी ताराबाईसाहेबांची जयंती १४ एप्रिलला आहे, असे कुठेही नोंदवले गेलेले नव्हते. मागच्या वर्षी विकीपीडियामध्ये कुणीतरी ही तारीख टाकून दिली; परंतू विकीपीडिया म्हणजे काही इतिहासाचे संदर्भसाधन नव्हे. या विकीपीडियामध्ये अनेक लोक बदल करू शकतात. तसाच बदल करून ताराबाईसाहेबांच्या जन्मतारखेबद्दल १४ एप्रिल ही तारीख कुठलाही संदर्भ न देता तिथे टाकली. त्यामुळेच आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते या दिवशी महाराणी ताराबाईसाहेबांच्या जयंतीच्या पोस्ट प्रसिद्ध झाल्या.