कोल्हापूर : शुभंमकरोती मंगल कार्यालय मंगळवार पेठ येथे लग्न समारंभातून गर्दीचा फायदा घेत चोरट्याने दागिन्यांची पर्स हातोहात लंपास केली. पर्समध्ये सोळा हजार रोकड, सोन्याचे गंठण, दोन मोबाईल, पितळी देवाची मूर्ती असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल होता. २३ फेब्रुवारीला हा प्रकार घडला.अधिक माहिती अशी, दादासाहेब अमृतराव देसाई (वय ५८, रा. सरदार पार्क, देवकर पाणंद रोड, कोल्हापूर) हे कुटूंबासह नातेवाईकाच्या लग्नासाठी मंगळवार पेठेतील मंगल कार्यालयात आले होते. गर्दीचा फायदा घेत त्यांच्या जवळ असलेली पर्स चोरट्याने लंपास केली. पर्स गायब झाल्याने त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याबाबत त्यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे तपास करीत आहेत.यापूर्वी पीरवाडी (ता. करवीर) येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेल्या सेवानिवृत्त लिपिक मधुकर मारुती वाघमारे (वय ६६, रा. खंडोबा मंदिराजवळ, लक्ष्मीनगर, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) यांची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली.
बॅगेमध्ये ३0 हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या, बँकेची कागदपत्रके असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. ही घटना ताजी असतानाच दूसरी घडना घडल्याने चोरट्यांनी मंगल कार्यालये लक्ष केल्याचे दिसून येत आहे.