कोल्हापूर : सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये सुरक्षारक्षक व नंतर शिपाई म्हणून काम केलेल्या शिवाजी केंबळे (मेजर) यांच्या आत्महत्येने त्यांच्यासोबत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. मनमिळावू स्वभावाच्या केंबळे यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.कसबा बावडा, चव्हाण गल्ली येथील शिवाजी केंबळे हे सैन्यदलातून निवृत्त झाल्यावर गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करीत होते. सुरुवातीला ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या केंबळे ऊर्फ मेजर यांच्या चांगल्या कामाची दखल घेत प्रशासनाने याच ठिकाणी शिपाई पदावर त्यांना कामाला घेतले. त्यांची कौटुंबिक स्थितीही चांगली होती. अलीकडेच त्यांनी आपला मुलगा योगेश याला राजारामपुरी येथे कपड्याचे दुकान काढून दिले होते. व्याप वाढल्याने आणखी एक दुकान काढले; त्यामुळे मुलग्याची धावपळ वाढली. त्याच्या मदतीसाठी केंबळे यांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज प्रशासनाकडे दिला होता. तीन महिन्यांनंतर ते निवृत्त होणार होते. जिल्हा परिषद वर्तुळात त्यांची प्रतिमा ही ‘चांगला व मनमिळावू कर्मचारी’ अशी होती. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी) मेजर म्हणूनच ओळखसकाळी वेळेवर कामाला येणे, आल्यानंतर आपले काम प्रामाणिकपणे व जबाबदारीने करणे ही त्यांची खासीयत होती. जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना, आपल्या सहकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आपल्या परीने शक्य तितकी मदत करणे असा त्यांचा स्वभाव असल्याने ते सर्वपरिचित होते. कुणालाही वेडावाकडा शब्द त्यांनी आजतागायत काढला नाही; या स्वभावामुळे त्यांच्याबद्दल आदराची भावना येथील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली. आदराने आणि हक्काने त्यांना सर्वजण ‘मेजर’ म्हणून हाक मारीत.
मनमिळावू ‘मेजर’ यांच्या मृत्यूने धक्का
By admin | Published: January 06, 2015 12:32 AM