इचलकरंजी : येथील आवाडे चित्रपटगृह परिसरात पोलीस गस्तीवेळी पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पोलिसांशी झटापट करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने धिंगाणा घातला. दहशत माजवत पथकातील एका पोलिसाचा शर्ट फाडला. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी लखन महंमद मोकाशी (वय ३२, रा. चांदणी चौक) याला अटक केली आहे. त्याच्याकडून १ तलवारही जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एवढी गंभीर घटना घडली असतानाही पोलिसांनी शासकीय कामात अडथळा असा गुन्हा दाखल करून ३ दिवसांपासून ही बाब प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवली आहे.
येथील पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांचे विशेष पथक शहरात गस्त घालत होते. हे पथक आवाडे चित्रमंदिर ते शेळके मळा या मार्गावर गस्त घालत असताना मांसाहारी खाद्यपदार्थाचा गाडा चालक आणि पोलीस रेकॉर्डवरील लखन मोकाशी याच्याकडे तलवार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथक मोकाशी याच्याकडे चौकशीसाठी गेले असता मोकाशी हा पोलीस नाईक सुनील पाटील यांच्या अंगावर गेला. झटापट करत आता तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली आणि तू याआधी माझा दारू व्यवसाय बंद केला आहेस, असे म्हणत पाटील यांचा शर्ट फाडला. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी मोकाशी याच्या घराची झडती घेतली असता दुसरी तलवार मिळून आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितले.