आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांना यावर्षीचा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ यांना बुधवारी जाहीर झाला. परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यास दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे यंदा २३ वे वर्षे आहे. पुरस्कार वितरण मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते, तर महापौर हसिना फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, अशी माहिती बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या आणि डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या अशी पुष्पा भावे यांची ओळख आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनातील लढा, दलित पॅन्थर चळवळीतील योगदान, जातीविरहित भारतीय समाज निर्मिती, एक गाव एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती, महिला बिडी कामगारांचे संंघटन, आदींबाबत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित वर्गासाठी त्या कार्यरत आहेत. त्यांनी मेघा पाटकर, निखिल वागळे, उल्का महाजन अशा अनेक कार्यकर्त्यांना घडविले आहे. त्याची दखल घेऊन यावर्षीच्या भाई माधवराव बागल पुरस्काराने सामाजिक कार्यकर्त्या भावे यांना गौरविले जाणार आहे. शाल, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्या आहेत. यापूर्वी अन्नसुरक्षा आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवराव बागल यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. २८) सकाळी साडेनऊ वाजता स्मृती अभिवादन समारंभ आयोजित केला आहे. छत्रपती राजर्षी शाहू मिलसमोरील भाई बागल यांच्या पुतळ््याच्या परिसरात हा अभिवादनाचा कार्यक्रम होईल. पत्रकार परिषदेस बाळ पोतदार, चंद्रकांत यादव, व्यंकाप्पा भोसले, आर. बी. कोसंबी, सुनीलकुमार सरनाईक, अनिल घाटगे, आदी उपस्थित होते.
पुरस्काराबाबत कृतज्ञता, आदर
सामाजिक कार्याच्या इतिहासातील भाई माधवराव बागल हे मोठे नाव आहे. त्यांच्या नावाने जाहीर झालेल्या पुरस्काराबाबत मी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मी पूणर्वेळ समाजकार्य करत नसतानाही माझी या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या बागल विद्यापीठाची मी ऋणी आहे. परिवर्तनवादी चळवळ आणि विचार हे बुलंद झाले पाहिजेत.