कोल्हापूर : येथील मेकर गु्रप इंडियाच्या ठेवीदारांची फसवणुक झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून न्याय मिळत नसल्याने हा फसवणुकीचा गुन्हा सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी ‘मेकर’च्या ठेवीदारांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. सहा महिने झाले, साधे आरोपींनाही पकडले गेले नाही. पोलिस निष्क्रिय आहेत, असा आरोपही ठेवीदारांनी यावेळी केला.
मेकर ग्रुप इंडिया कंपनीकडून ४५ हजार ठेवीदारांची ५६ कोटी ४४ लाख रुपयांच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीबद्दल शाहुपूरी पोलिस ठाण्यात दि. ८ डिसेंबर २०१८ रोजी रितसर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत करुन पोलिस निरीक्षक कुमार कदम यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. कदम यांना ठेवीदार, एजंट यांच्याकडून संपूर्ण सहकार्य करुन गुन्ह्यातील सर्व कागदपत्रे पुराव्यानिशी त्वरीत पूर्तता केली.
पोलिस निरीक्षक कदम यांनी ठेवीदारांचा मेळावा घेतला तसेच दाखल झालेल्या एफआयआर नुसार आरोपींना अटक करुन त्यांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता जप्त केल्या जातील, बॅँकांची खाती गोठविण्यात येतील अशी ग्वाही दिली होती. परंतु गेल्या पाच महिन्यात एकाही आरोपीला अटक झालेली नाही.तपासात प्रगती नाही. तपासातील दिरंगाईमुळे पोलिसांकडून आपणास न्याय मिळणार नसल्याची भावना ठेवीदारांची झाली आहे, असे कृती समितीचे अध्यक्ष नाथाजीराव पोवार यांनी पत्रकारांना सांगितले. पोलिस निरीक्षक कदम यांनी आम्हाला न्याय द्यायचा सोडून उलट ठेवीदारांवरच दबाव आणू पहात आहेत, असा आरोप पोवार यांनी केला.
मेकर इंडिया संचालकांची नावे -चेअरमन - रमेश वळसे-पाटील- संचालक - मनोहर आंबुळकर, बी.बी, लिमकर, श्रीधर खेडेकर, संतोष कोठावळे, ज्ञानदेव कुरुंदवाडे, पुरुषोत्तम हसबनीस, दादा पाडळकर, बी.जी.आराध्ये, भास्कर नाईक, एन.पी.खर्जे, चंद्रशेखर आराध्ये, मीना राठोड, माधव गायकवाड, कमलाप्पा, मनिषा सासर, श्रीराम डावरे, गौतम माने. - कार्यालय - इंदिरा हाईटस्, शाहूपुरी ४ थी गल्ली, कोल्हापूर