कोल्हापूर : गोकूळ दूध संघाची ताकद महायुतीतील शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मागे लावा, असा थेट फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना केला. या मोबाइल संदेशाची क्लिप मुख्यमंत्री व डोंगळे यांच्या छायाचित्रासह तयार करून बुधवारी रात्री व्हायरल करण्यात आली. त्याच्या इंग्रजी ओळीमध्ये मुख्यमंत्र्यांना सीएम एकनाथ शिंदे कॉलिंग डोंगळे साहेब असे म्हटले आहे. गोकूळ दूध संघावर दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे. संघाचे नेतृत्व महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील आणि महायुतीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. संघाच्या संचालकाची तो ज्या गावचा आहे, त्या पंचक्रोशीत ताकद असते. दूध संस्थांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क असतो. दूध बिलामुळे शेतकऱ्यांचे, दूध उत्पादकांचे रोजचे जगणे संघाशी निगडित आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत गोकूळची ताकद सर्वच राजकीय पक्षांना हवी असते. आताही या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना या ताकदीची गरज भासली आहे. त्यामुळे त्यांनी अध्यक्ष डोंगळे यांना मोबाइलवर संपर्क साधला. मी एकनाथ शिंदे बोलतोय असे मुख्यमंत्री नुसते म्हणताच डोंगळे यांनी स्वत:हूनच आम्ही गोकूळची पूर्ण ताकद दोन्ही उमेदवारांच्या मागे लावतो. कोणत्याही स्थितीत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. ते सांगण्यासाठीच काल मी आपल्याला शाखेला भेटायला आलो होतो परंतु भेट झाली नाही. मात्र गोकूळची पूर्ण ताकद त्यांच्या मागे राहील, अशी व्यवस्था करतो. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला संजयला पूर्ण ताकदीने मदत करायची आहे, असे सांगितले. डोंगळे यांनी शंभर टक्के मदत करतो, असा शब्द मुख्यमंत्र्यांना दिला.
गोकूळमधील सत्तेची सद्यस्थिती काय..सध्या महाविकास आघाडीकडे बारा आणि महायुतीकडे दहा संचालक आहेत. चेतन नरके हे स्वत:च उमेदवार आहेत. तज्ज्ञ संचालकांसह चोवीसपैकी कोल्हापूर लोकसभा मतदार संघात १८ आणि हातकणंगले मतदार संघात ५ संचालकांचे कार्यक्षेत्र येते. सुमारे पाच लाख दूध उत्पादकांशी संघ जोडलेला आहे.