लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाकाळात ऑनलाईन पध्दतीने शिकविले. पण, पाल्याला जर लिहिता, वाचता येत नसेल, तर पुढील वर्गात पाठविणे योग्य ठरणार नाही. पाल्याचे भविष्य महत्त्वाचे असल्याचे सांगत अनेक पालक हे त्यांच्या पाल्याला पुन्हा पहिलीतच बसविण्याची मागणी शाळांकडे करत आहेत. मात्र, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) पालकांची ही मागणी मान्य करता येत नसल्याने शाळांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्यावर्षी जूनमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे शिक्षण त्याला समजले का? हाताला धरून पहिलीच्या विद्यार्थ्याला शिकवावे लागते. मग, मोबाईलवर पीडीएफद्वारे पाठविलेली अक्षरे त्याला समजली का? जर समजली, तर प्रत्यक्षात ती लिहिता येतात का?, जर लिहिता येत नसेल, तर मग त्याला पुढच्या वर्गात प्रवेश द्यायचा का?, असे अनेक प्रश्न पालकांमध्ये निर्माण झाले आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून त्याला पुन्हा पहिलीतच बसविण्याचा निर्णय पालक घेत आहेत. शासनाच्या आरटीई कायद्यानुसार कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवता येत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी जूनमध्ये पहिलीत प्रवेशित झालेले विद्यार्थी हे नियमानुसार यंदा जूनमध्ये इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये जाणार आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांच्यादृष्टीने निर्माण झालेला हा प्रश्न शासन, शिक्षण विभागाने गांभीर्याने विचार करून सोडविणे आवश्यक आहे.
चौकट
...तर पटसंख्येचा घोळ होणार
पाल्य प्रवेशित असलेल्या शाळेने याबाबत सकारात्मक कार्यवाही केली नाही, तर शाळा बदलून पाल्याला पहिलीमध्ये नव्याने प्रवेशित करण्याच्या पर्यायाचा पालक विचार करीत आहेत. अशा पध्दतीने जरी पाल्याला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाल्यास विद्यार्थी पटसंख्येचा घोळ निर्माण होणार आहे. ‘आरटीई’नुसार ते योग्य ठरणार नाही.
प्रतिक्रिया
पालकांच्या या स्वरूपातील मागणीमुळे शाळा व्यवस्थापनासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी पहिलीमध्ये प्रवेशित झालेल्या ज्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी प्रत्यक्ष शिकविण्याची गरज आहे, त्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवता येईल का? याबाबत लवकर निर्णय व्हावा.
- विश्वास केसरकर, मुख्याध्यापक, कोल्हापूर.