कोल्हापूर : गेल्या दहा दिवसांपासून बजाप माजगावकर तालीम परिसरातील रस्त्याचे काम बंद आहे. काही ठिकाणी मोठी खडी टाकली आहे, तर काही ठिकाणी रस्ता उकरून ठेवला आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. तुमचे राजकारण बाजूला ठेवा आणि रस्ता करा, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली
महापालिकेच्या जवळच असणाऱ्या बाजारगेट प्रभागातील रस्त्याच्या कामाला पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते धूमधडाक्यात सुरुवात झाली. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून येथील काम रखडले. परिसरातील रस्त्याची कामे वर्कऑर्डरशिवाय झाली असल्याचा आरोप माजी आमदारांनी केल्यानंतर ठेकेदाराने येथून पळ काढल्याचे समजते. रस्त्यावर खडीचे ढीग आणि अपूर्ण कामामुळे नागरिकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत असून त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पापाची तिकटी येथील बजाप माजगावकर तालीम ते शाहू उद्यान, शाहू उद्यान ते पापाची तिकटी (अर्बन बँक पिछाडीस) आणि तेली गल्ली ते डोर्ले कॉर्नर येथील रस्त्याचे काम सुरू झाले होते. याचदरम्यान, या प्रभागात निविदेशिवाय बेकायदेशीर रस्त्याची कामे सुरू असल्याचा आरोप माजी आमदारांकडून झाला. काम करताना अडचण निर्माण होईल, या भीतीने ठेकेदार गायब झाला असून रस्ता अर्धवट राहिलेला आहे. महापालिका प्रशासनाकडे चौकशी केली असता, बजाप माजगावकर तालीम ते शाहू उद्यान आणि रजपूत घर ते शाहू उद्यान या दोन रस्त्यांना परवानगी असल्याचे म्हटले आहे.
चौकट
एका रस्त्यासाठी तीन गल्लीतील काम बंद
जोशी गल्ली ते जुनी कुंभार गल्ली रस्ता गेल्या काही दिवसांपासून खराब झाला आहे. नागरिकांची रस्ता करण्याची मागणी होती. येथील काम तातडीने करणे गरजेचे असल्याने संबंधित लोकप्रतिनिधीने ऐच्छिक निधीतून रस्ता करण्याचे नियोजत केले. ठेकेदाराला विनंती करून कामाला सुरुवात करण्यास सांगितले. येथील एका कामावरून परवानगी असलेल्या रस्त्यांची इतर कामेही थांबली आहेत.
फोटो : १८०१२०२१ कोल केएमसी बाजारगेट रस्ता
ओळी :
कोल्हापुरातील बजाप माजगावकर तालीम येथील रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत रखडले आहे. त्याचा स्थानिक लोकांना त्रास होत आहे.