चंदगड तालुक्यातील अगदी टोकाचे कानडी गाव व तेथील विद्यामंदिर ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा गुणवत्ता श्रेणीमध्ये अव्वल आहे. अवघे ८५० लोकवस्तीचं गाव. पटसंख्या १०९ आहे. ही शाळा म्हणजे जणू काही मागासवर्गीय व मुलींच्या शिक्षणासाठी वरदान ठरलेली. ^६३ मुली या शाळेत. त्यापैकी ३६ मागासवर्गातील. या शाळेमुळे त्या अडाणीपणा, बालविवाह यापासून बचावलेल्या. ५६ मागासवर्गीय मुले. शिक्षणात हुशार, बोलण्यात तरबेज, आत्मविश्वासाची व महत्त्वाकांक्षेची सर्वच मुले. अशा वंचित, अपेक्षित व दुर्गम भागातील विद्यादानाचा हा यज्ञ व शिक्षकांची ही तपश्चर्या खरोखरच सामाजिक अभिसरण, समता आणि शिक्षणातून सर्वांगीण विकासाकडे नेणारी. शिक्षक पाच, जणू गुरुकुलातील पंचऋषी. शिक्षक १६ तास शाळेत असतात.शिक्षकवृंद प्रशिक्षित, वाचनप्रेमी व कार्यमग्न मॅच्युअर असा वाटला. श्रीकांत सावंत हे शिक्षक इंग्रजीचे राज्य रिर्सोस पर्सन म्हणून आहेत. सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाची क्षमता वाढविण्यावर भर आहे. काही विद्यार्थी अप्रगत असले तरी जादा वर्ग घेऊन त्यांची तयारी पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले. वरच्या वर्गातून मुलांना शाळा, राष्ट्रीय दिन, आई, शिक्षक, ऋतू वगैरेंची माहिती इंग्रजीमधून लिहायला सांगितली. विद्यार्थ्यांची लेखन क्षमता चांगली आणि वाचन क्षमतासुद्धा उत्तम असल्याचे जाणवले. पेरू, पिंपळ, आंबा, फणस, जांभूळ, करक, शिसम, काजू, केळी, चिक्कू वगैरे झाडांविषयी माहिती हर्बेरियन पद्धतीने दिलेली. सचित्र वास्तववादी उपक्रम. तुळस, जास्वंद, गवती चहा, अडुळसा, सुपारी यांसारख्या हिरव्या मित्रांची माहिती नोंदी पाहणी व काहीचे शाळा परिसरात रोपण आहे. फलौषधी, पानषौधीची माहिती आहे. वाळू नारळाचे केसर करवंटी, काचा, धान्य डाळी वगैरेंच्या वापरातून चित्रे वा कोलाज स्पर्धा. प्राणीजगत, फळांचे जग अशासारख्या फाईल्स लक्षवेधक. त्या बोध, ज्ञान व आनंद देणाऱ्या.कानडी गाव छोटे, पण शैक्षणिक उठाव ९३ हजार रुपयांचा, शिवसंघर्ष मंडळाने ५००० रु. देणगी दिलेली. शिक्षक वेळ, समय, श्रम याबरोबरच आर्थिक मदत म्हणून दर महिन्याला काही रक्कम उपक्रमांवर खर्च करतात. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचे सहकार्य, ग्रामस्थांचे साहाय्य, माता- पालकांची मुला-मुलींच्या उपस्थितीबद्दल जागरूकता, क्षेत्रभेटी, बालसभा, बालआनंद मेळावा यामुळे शिक्षण आनंददायी वाटावे असे वातावरण. मनोरंजनाचे कार्यक्रम अगदी चांगले, एवढेच नव्हे, तर सांस्कृतिक स्पर्धेच्या समूहनृत्य प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेली ही शाळा.शिक्षक बँकेकडून हिरवी शाळा हा पुरस्कार, सामान्यज्ञान स्पर्धेत यश मिळणारी, दुष्काळग्रस्तांना चिमुकल्यांनी मदत देऊन सामाजिक भान जतन करणारी, बाल आनंद मेळावा व माता-पालक मेळाव्यातून पाल्य-पालकांचे नाते सुदृढ करण्यासाठी उपक्रम राबविणारी, संगणक व पुस्तके यांची ओढ व आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारी ही विद्यामंदिर, कानडी शाळा खरोखरच मॉडेल स्कूल. लेझीम, झांज व परिपाठ हेच मुळे भारावून टाकणारे. ही शाळा जिल्ह्यासाठी आदर्श वास्तुपाठच शैक्षणिक गुणवत्तेचा! उपक्रमांचे वार्षिक नियोजन, घटक नोंदी व टाचण वही सर्व शिक्षकांची मुख्याध्यापकांच्या सहीसह आढळली. अहवाल व्यवस्थित, खरोखरच शैक्षणिक सर्वांगीण गुणवत्ता व्यवस्थापनाचा आदर्श पाठ असलेली शाळा.- डॉ. लीला पाटील‘शाळेची वैशिष्ट्येलेक वाचवा’साठी मुलगा-मुलगी समानतेसाठी शाळेत राबविले जाणारे उपक्रम आणि उत्कटतेने उत्कृष्ट रितीने लिंगभेदविरहित शैक्षणिक वातावरण असलेली शाळा.माता-पालक मेळावे व बैठका घेऊन त्यांना उद्बोधन केले जाते. उपक्रमाचे टाईमटेबल वार्षिक आहे. शाळेचे त्यानुसार नियोजन आहे. सप्टेंबर महिन्यात निबंध, पत्रलेखन, मुद्द्यावरून कथा, स्वच्छता मिशन, मुलगा-मुलगी समानतेसाठी रात्री काय खाल्लं हा विषय लेखनासाठी देऊन आरोग्यविषयक जाणीव निर्माण केली जाते. आहार, त्यातील घटक, आरोग्यदायी आहार, मिठाचे उपयोग, कॅल्शियम जीवनसत्वे वगैरे, डोळ््याची काळजी, स्वच्छता दिन घेतले जाते.सामान्यज्ञान वाढावे व अभ्यासाचा समावेश असलेले शरीरविज्ञानाशी भूगोल, इतिहासाशी निगडित असे प्रश्न देऊन गटपद्धतीने उत्तरे शोधणे व तपासणी केली जाते. ‘सेव्ह द बर्ड’ला विशेष उपक्रम. माध्यान्ह आहाराच्यावेळचे जेवणानंतर खरकटे विद्यार्थी गोळा करतात. झाडावर टांगलेल्या प्लास्टिकच्या बाऊलमध्ये टाकतात. पक्षी ते खाण्यासाठी हजर जणू रोजचाच शिरस्ता. पक्षिप्रेम व खरकटे काढण्यातून स्वच्छता हे मूल्य रुजविले जाते. केरकचरा, पालापाचोळा, काटक्या, पाने वगैरे एकत्र करून कंपोस्ट खत तयार करतात. गांडूळ खत प्रकल्पही विद्यार्थ्यांकडून राबविला जातो .
गुणवत्तेचे मॉडेल विद्यामंदिर कानडी
By admin | Published: June 26, 2015 12:15 AM