कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शैक्षणिक, संशोधनात्मक उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण अधिविभागांना ‘स्वायत्त अधिविभाग’ हा दर्जा मिळणार आहे. परगावाहून विविध कामासाठी येणारे विद्यार्थी, पालकांसाठी विद्यापीठात केंद्रीय विद्यार्थी सहाय्यता कक्ष उभारला जाणार आहे. त्याबाबतचे ठराव विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये झाले आहेत.
विद्यापीठात बुधवारी झालेल्या अधिसभेमध्ये एकूण ४७ ठराव मांडण्यात आले. त्यापैकी ८ ठरावांना मान्यता देण्यात आली, तर ३९ ठराव मागे घेण्यात आले. यावेळी मंजूर ठरावांमध्ये विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी रायफल शुटिंग रेंज आणि ऑबस्टॅकल ट्रॅक तयार करणे, विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमधील प्रशासकीय सेवक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्यास त्यांना प्रोत्साहनपर मानधन म्हणून अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करणे, विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयातून अनेकवेळा विद्यार्थ्यांना विद्यापीठात त्यांच्या कामासंबंधी पाठविले जाते, ते टाळण्यासाठी संलग्नित प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करावे. प्राध्यापक पद मंजूर असूनही ज्या संलग्न महाविद्यालय, संस्थेकडून या पदावरील निवडीबाबतचे प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झालेले नाहीत, अशा महाविद्यालयाकडून हे प्रस्ताव तातडीने मागवून घेत मंजूर प्राध्यापक पदावर नेमणुका, निवडी होणे यांचा समावेश आहे.
चौकट
प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावेत
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थी, पालक, नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घ्यावेत. राज्य शासनाने विद्यापीठांसाठी तयार केलेले सर्व एकरूप परिनियम पुस्तक स्वरूपात अथवा संकेतस्थळावर सर्वांना उपलब्ध करून द्यावेत, या ठरावांचाही समावेश आहे. मंजूर झालेले ठराव श्रीनिवास गायकवाड, पंकज मेहता, दिनेश जंगम, इला जोगी, महेश निलजे, एस. डी. डेळेकर यांनी मांडले आहेत.
प्रतिक्रिया
मंजूर झालेल्या ठरावांची संख्या एकूण ठरावांच्या तुलनेत कमी असली, तरी विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यापीठ विकासाच्यादृष्टीने ते महत्त्वपूर्ण आहेत. अधिसभेतील ठराव हे विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषद, अभ्यास मंडळांकडे जातील. या अधिकार मंडळांकडून संबंधित ठरावांच्या अंमलबजावणीची कार्यवाही लवकर व्हावी.
- संजय जाधव, अधिसभा सदस्य