प्रशांत कोडणीकर ।नृसिंहवाडी : येथील पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमजवळील पाणी काळपट हिरवे व दुर्गंधीयुक्त झाले असून, हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील नदीप्रदूषणचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.शिरोळ तालुक्याला वरदायी ठरलेली कृष्णा व पंचगंगा या दोन्ही नद्या कोल्हापूर व इचलकरंजी या दोन्ही शहरांसह अनेक गावांतील थेट नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी, औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे प्रक्रिया न करता सोडलेले प्रदूषित पाणी यामुळे नद्या दूषित बनत आहेत. या प्रदूषणामुळे तालुक्यातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
त्यातच श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्तदेवस्थानला येणारे यात्रेकरू विविध खराब वस्तू, निर्माल्य थेट नदीत टाकून प्रदूषण वाढविण्यास हातभार लावत आहेत. कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर आधीच हिरवट व काळपट झालेले नदीचे पाणी व त्यात निर्माल्य, त्यामुळे नदीच्या पाण्याला घाण वास येऊ लागला आहे.दत्त मंदिरासमोर नदी स्वच्छताश्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्यावतीने मंदिर परिसरातील नदी स्वच्छ करण्यात आली. नदीतील विविध वस्तू, कपडे, निर्माल्य व मेलेल्या माशांच्या ढीग येथील नावाडी, कर्मचारी, आदी सर्वांनी मिळून ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून पाठवून निर्गत करण्यात आली. या मोहिमेत दत्त देव संस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी, सचिव प्रा. गुंडो पुजारी, विश्वस्त गोपाळ पुजारी, कर्मचारी ज्ञानेश्वर भोसले, अमर इंगळगावकर, शीतल मुडशिंगे, रामदास लोंढे, दत्तात्रय शिंदे, अरुण गावडे, मज्जीद कलगी, आदींनी परिश्रम घेऊन येथील दत्त मंदिरासमोरील नदीची स्वच्छता केली.