कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पत्रकारांना हक्काच्या घराचा प्रश्न तातडीने सोडवू ,' असे आश्वासन म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी शनिवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी गृहप्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. म्हाडाचे अध्यक्ष म्हणाले, पत्रकारांना घरे देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सोलापूर येथे पत्रकारांना घरे दिली आहेत, कोल्हापुरात गेली अनेक वर्षे मागणी आहे.
पत्रकार समाजातील विविध घटकांना न्याय देतात, त्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडवणे क्रमप्राप्त आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर गतीने काम करावे. उत्पन्नगटावर आधारित घरे मिळावीत यासाठी माझ्याकडून पूर्ण सहकार्य राहील.यावेळी म्हाडाचे सीईओ अशोक पाटील, जिल्हाधिकारी देसाई यांनी विविध सूचना केल्या. प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, पत्रकारांसाठी होणाऱ्या प्रकल्पात सर्व पात्र पत्रकारांना घरे मिळावीत. यासाठी प्रेस क्लबतर्फे पत्रकारांच्या घराचा प्रश्न तातडीने मार्गी लावून सहकार्य करु.यावेळी प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सदानंद पाटील, सचिव बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, खजानीस इकबाल रेठरेकर, संचालक सुनील पाटील, प्रदीप शिंदे, तय्यब अली, संदीप पाटील, शशिकात मोरे संजय साळवी दिपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.