आजरा : साळगाव (ता. आजरा) येथील भूमिहीनांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेली दोन वर्षे ऐरणीवर होता. मंगळवारी तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्ष मोजणी करून सदर प्रश्न निकालात काढल्याने गेली ४३ वर्षे भूमिहीनांना असणारा रस्ता खुला झाला आहे.साळगाव येथील भूमिहीन बबन यशवंत वड्ड, अर्जुन महादेव सूर्यवंशी, मोहन रामचंद्र कांबळे, सोनाबाई सुतार व दयानंद पांडुरंग रामाने यांना १९७२ मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी ६.५ गुंठे जमीन घरबांधणीसाठी दिली होती. गट नं. २८/१ मधील या जागेचे मूळ मालक नेऊंगरे हे होते. २८/२ गट नं. नेऊंगरे यांच्याकडेच आहे. जागावाटप करताना प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या १३० चौ.मी. जागेपैकी १०० चौ.मी. जागा घरासाठी व ३० चौ. मी. जागा वहिवाटीसाठी ठेवण्याबाबतची शर्त घालण्यात आली होती. याप्रमाणे संबंधितांना जागा वाटप झाले. येथे झोपड्यावजा घरे बांधून ही मंडळी राहू लागली. २००३ मध्ये हिरण्यकेशी नदीला पूर आल्यानंतर मात्र झोपड्यांच्या जागी प्रत्येकी शंभर चौरस मीटर जागेत पक्की घरे बांधण्यात आली. उर्वरित ३० चौ. मी. जागा सोयीप्रमाणे सोडल्याने वहिवाटीच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला.प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच चालला होता. अखेर मंगळवारी तहसीलदारांनी स्वत: यामध्ये लक्ष घालत प्रत्यक्ष मोजणी घातली. अतिक्रमणे काढण्याची सूचना केली आणि रस्ता मिळवून दिला. यावेळी निवासी तहसीलदार डी. डी. कोळी, बबन शिंदे, भूमी अभिलेखचे पठाण, मुक्ती संघर्षचे कॉ. संग्राम सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साळगाव येथील रस्त्याचा प्रश्न ४३ वर्षांनंतर संपुष्टात
By admin | Published: February 10, 2015 11:14 PM