शिरोळ : उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी पुराची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. परंतु पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून उत्तर देण्याचा गुंता मंत्री पवार यांच्यासमोर निर्माण झाला. प्रत्येकवर्षी हीच परिस्थिती निर्माण होणार, आम्ही महापुराला असेच सामोरे जायचे का? असे प्रश्न पूरग्रस्तांनी उपस्थित केले. राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी असून, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लवकरच धोरण ठरेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी शिरोळ येथील जनता हायस्कूल परिसर व अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली, तर श्री पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, ‘ दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, संजय पाटील-यड्रावकर उपस्थित होते.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री पवार हे वेळेच्या पंधरा मिनिटे अगोदर आल्याने प्रशासन व राजकीय मंडळींची धावपळ उडाली. उपमुख्यमंत्री पवार यांनी पद्माराजे विद्यालयात पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. निवारा केंद्रात घरच्यापेक्षा चांगली व्यवस्था हाय; पण प्रत्येकवर्षी महापूर आला, तर असंच त्याला सामोरे जायचं का, पावसाळ्यात आमची पर्यायी व्यवस्था करा. पावसाळा संपला की शेती, मजुरीसाठी पुन्हा गावाकडेच जाणार. पूरग्रस्तांच्या या प्रश्नांमुळे मंत्री पवार यांच्यासमोर गुंता निर्माण झाला. अर्जुनवाड येथेही त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी अर्जुनवाडमार्गे सलगर ते पाचवा मैल सुरू असलेल्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यावर पर्याय म्हणून मोरी वजापुलाचे बांधकाम करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी पवार यांनी तातडीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित आदेश दिले; तर जनावरांच्या चाऱ्याकरिता साखर कारखान्यांकडून चारा उपलब्ध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजू बाबा आवळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक एस. एम. लोहिया, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, माजी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : १) शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला.
२) शिरोळ येथील जनता हायस्कूल परिसर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुराची पाहणी केली .यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘ दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील उपस्थित होते.