कोल्हापूर : विज्ञान (सायन्स) विद्याशाखेतील अंतिम सत्र, वर्षाच्या काही अभ्यासक्रमांच्या सराव परीक्षेतील ५० टक्के प्रश्न हे मराठीतून विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. दोन ते तीन प्रश्न सोडविल्यानंतर या परीक्षेच्या लिंकमधून बाहेर पडण्याच्या तांत्रिक अडचणीचा त्रासही या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.
विद्यापीठाने अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्यात सुमारे ५० हजार विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. त्यांना या पद्धतीची माहिती व्हावी या उद्देशाने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेण्यात येत आहे. त्याची सुरुवात गुरुवारी (दि. १५) दुपारनंतर झाली. या सराव परीक्षेची लिंक विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे पाठविण्यात आली आहे.
विज्ञान विद्याशाखेतील काही विद्यार्थ्यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी सराव परीक्षा दिली. त्यांच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील (एमसीक्यू) प्रश्नपत्रिकेमध्ये ५० टक्के प्रश्न हे इंग्रजीतून, तर उर्वरित प्रश्न हे मराठीमधून विचारण्यात आले होते. मराठीतील प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरील होते. अर्थशास्त्र, सामाजिकशास्त्राशी संबंधित काही प्रश्न होते. त्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यात तांत्रिक अडचणींची भर पडल्याचे सांगत या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
सराव परीक्षेतच गोंधळ असेल, तर पुढे काय होईल, अशी भीती काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, याबाबत परीक्षा मंडळाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रभारी संचालक गजानन पळसे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी तो घेतला नाही.संपर्क क्रमांकही व्यस्तविज्ञान शाखेतील या सराव परीक्षेतील अडचण सांगण्यासह मार्गदर्शन मिळविण्यासाठी कोल्हापुरातील एका पालकाने विद्यापीठाने संकेतस्थळावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही क्रमांक व्यस्त, तर काही संपर्कक्षेत्राबाहेर होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही. त्यामुळे पुढे प्रयत्न थांबविल्याचे सांगत या पालकाने नाराजी व्यक्त केली.
ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप माहीत व्हावे यासाठी सराव परीक्षा घेण्यात येत आहे. या सराव परीक्षेत येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्याचे विद्यापीठाकडून निराकरण केले जाईल. प्रत्यक्षात होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत या अडचण येऊ नयेत याची दक्षता घेण्याची सूचना परीक्षा मंडळाला केली आहे.- डॉ. डी. टी. शिर्के,कुलगुरू