कोल्हापूर : विशाळगड येथे १४ जुलैला जोरदार पाऊस आणि धुके असल्यामुळे हिंसा करणाऱ्या हल्लेखोरांना रोखू शकलो नाही, असा खुलासा पोलिसांनी सोमवारी (दि. २९) मुंबई उच्च न्यायालयात केला. मात्र, त्यानंतर १५ दिवस उलटले तरी हिंसा घडवणाऱ्या प्रमुखांना अटक का केली जात नाही? अटक न करण्यासाठी काय कारणे आहेत? असा सवाल हिंसाग्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे.विशाळगड येथील अतिक्रमणे आणि १४ जुलैला झालेल्या हिंसेबद्दल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी पोलिसांची बाजू मांडली. १४ जुलैला विशाळगड येथे प्रचंड पाऊस आणि धुके असल्यामुळे हिंसा रोखू शकलो नाही, असा खुलासा घेरडे यांनी केला. तसेच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणांची माहिती दिली. मात्र, पोलिसांच्या भूमिकेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.हिंसा रोखण्यात आलेल्या अपयशाचे खापर पोलिसांकडून पाऊस आणि धुके यावर फोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. घटना घडून १५ दिवस उलटले तरी हिंसेला कारणीभूत असलेल्या प्रमुख संशयितांना अटक का होऊ शकली नाही? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.गुन्हा ५०० जणांवर, अटक केवळ २४पोलिसांनी दाखल केलेल्या पाच गुन्ह्यांमध्ये सुमारे ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील केवळ २४ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यात एकाही म्होरक्याचा समावेश नाही. रवींद्र पडवळ आणि बंडा साळोखे हे दोघेही अजून पसार आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाचा गुन्हा आहे. पण, तोही पोलिसांनी लपवल्याचे स्थानिकांनी सांगितले.
बंदोबस्ताचे नियोजन चुकले?विशाळगडाच्या पायथ्याला किती आंदोलक येतील याचा अंदाज घेण्यात पोलिस अपयशी ठरले. परिणामी, ते पुरेसा बंदोबस्त तैनात करू शकले नाहीत. बंदोबस्ताचे नियोजन करण्यात उणिवा राहिल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.