इंद्रजित देशमुखमाणसाची कर्मे चार गोष्टींनी पूर्ण होतात. कर्मातील भाव, कर्मातील विचार, कर्माची वाणी आणि कर्माची कृती. म्हणजे भाव, विचार, वाणी आणि कृती यांनी कर्म बनते. यातील भाव हा सर्वांत सूक्ष्म असतो. कारण भाव जितका शुद्ध तितके कर्म चांगले. ईश्वर प्राप्तीसुद्धा भावानेच प्राप्त होते. संपूर्ण पालखी सोहळा भावानेच तोलून भरला आहे. बुद्धी भेद निर्माण करते, पण भाव माणसाला एकत्र आणतो. विठ्ठल नामाने भरलेली हृदये या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. ध्येय ध्याता एकच असतो विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल. तो सोबत आहे. आता पावसाच्या सरीवर सरी सुरू आहेत, पण पावलांना थांबणे ठाऊक नाही. माउलीच्या सोबत चालणे सुरूच आहे. निष्ठावंत वारकरी माउलीसोबतच चालतात, माउलीसोबतच थांबतात. माउली विश्रांती घेतात तेव्हाच ते विश्रांती घेतात. चालणं, जागरणं, अत्यवस्था याची कोणतीही फिकीर नाही. कारण त्यांची श्रद्धा सांगते.भाव ज्याचे गाठी।त्यासी लाभ उठा उठी।संत वचनाप्रमाणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. आधुनिक मानसशास्त्रात बुद्ध्यांकाबरोबर व्यक्तीस भावनांक असेल तरच व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होते, हे सिद्ध होत आहे. भाव हा हृदयाचा आधार आहे. भावाने ओतप्रोत भरलेल्या भक्तास दुसरे काही सुचत नाही. त्याला सर्वत्र तोच दिसतो. त्याच्या चालण्या, बोलण्या-वागण्यात, मनात, स्वप्नात तोच असतो.पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी।जागृती स्वप्नी पांडुरंग। ससंगतु।जळी, स्थळी, चर, अचरात भरलेला देव हा भावानेच प्राप्त होतो. भाव जेवढा घनदाट तेवढी मानसिकता उच्चस्तरीय असते. भावानेच साधनेला गती आणि परिपक्वता प्राप्त होते. भावाची घनता वाढली की, दिव्यत्वाला सुरुवात होते. निर्दोष जगण्यास सुरुवात होते. भाव दिव्यत्वाच्या राज्यात प्रवेश करण्याचे महाद्वार आहे.भावेविण देव न कळे संदेह। किंवाभाव बले आकळे येºहवी नाकळी।करतळी आवळे तैसा हरी।या हरिपाठातील वर्णनानुसार तो आकळता येतो.भावाचे अंतरंग सर्वार्थाने समजण्यासाठी अलीकडे इंदिरा संतांची एक छान कविता वाचण्यात आली. ‘कुब्जा’ या कवितेत इंदिरा संत लिहितात, अजून पहाट व्हायची आहे आणि अशा अवेळी कुब्जा दासी मथुरेच्या बाजूने यमुनेमध्ये उतरली आहे. ती कुरुप आहे, पण तिचे भावविश्व भगवंताने व्यापून राहिले आहे. ती पाण्यात उतरते आहे. तेव्हा पहाट वारा भणभणतोय, सारी सृष्टी झोपली आहे आणि अशावेळी पैलतीरावरून बासरीचा आवाज येतो आहे. भगवंताची बासरी ही फक्त राधेसाठी असते, गोकुळवासीयांसाठी असते ते तिला माहीत आहे, पण अजूनही जागी नाही राधा, अजूनही जागे नाही गोकुळ. मग ही बासरी कुणासाठी वाजते आहे. असे क्षणभर तिला वाटते, पण तिच्या लक्षात येते तो मुरलीरव फक्त मजचिस्तव आहे आणि ती आनंदाने भरत जाते. भगवंत सर्वांवर प्रेम करतो मग मी दासी आहे, कुरुप आहे. तो माझ्यासाठीसुद्धा वाजवतो, जागा राहतो. हा भाव दाटून तिची सारी कुरुपता नष्ट होते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. देवाला भक्ताचा निस्सीम भाव सोगावा लागला नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शब्दांचीच गरज असते असे नाही आणि कुरुपतेचा आणि दिव्यभावाचा काही संबंधच नसतो.शुद्ध ज्याचा भाव झाला।दुरी नाही देव त्याला।किंवा संतवचनाप्रमाणेभावे गावे गीत।शुद्ध करोनिया चित्त।।तुज व्हावा आहे देव ।तरी हा सुलभ उपाय।जो तारणहार आहे, त्याच्याविषयी मानवी जगतात भाव असतोच; परंतु प्राणी जगतातसुद्धा अनाकलनीय भाव असतो. ‘लॉरेन्स अॅन्थनी’ नावाचा वन्यप्राण्यावर प्रेम करणारा दक्षिण आफ्रिकेतील एक माणूस. हा ७ मार्च २०१२ रोजी मरण पावला. त्याचे हत्तीवर विशेष प्रेम होते. त्याने वाचवलेले ३१ हत्ती जंगलातून २० कि. मी.चा प्रवास करून लॉरेन्स यांच्या दारात येऊन पोहोचले. त्यांच्या अंगणात २ दिवस २ रात्री न काही खाता पिता राहिले आणि तसेच निघून गेले. आपल्या तारणहारास मानवंदना देण्यासाठी ही मुकी जनावरे कशी आली असतील. त्यांना लॉरेन्सचा मृत्यू कुणी सांगितला असेल हे सारे आश्चर्यकारक आहे. त्यांच्या ठायी असलेला कृतज्ञतेचा उच्चतम भाव त्यांना तिथंपर्यंत घेऊन आला.(लेखक संत साहित्याचेअभ्यासक आहेत.)
भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठा उठी।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:30 PM