जोतिबा : जोतिबा मंदिरात स्त्रियांसाठी स्वतंत्र दर्शन रांग करण्याची सूचना शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र जोतिबा येथील सदिच्छा भेटी दरम्यान केली. श्री क्षेत्र जोतिबा डोंगरला शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी सदिच्छा भेट देऊन दख्खनचा राजा श्री जोतिबाचे आपल्या मातोश्री व बहीण यांच्यासमवेत दर्शन घेतले. जोतिबा मंदिरात महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांग नसल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांग करण्याची सूचना केली. मंदिराची पाहणी करताना संपूर्ण मंदिराला आॅईल पेन्टने रंगकाम केल्याचे दिसून आल्यावर त्यांनी पुरातन वास्तुला कोणताही रंग न लावता मूळ सौंदर्यात वास्तु शिल्पे जतन करावीत .पाश्चात्य देशात मंदिर संरक्षणासाठी मंदिराच्या शिखरापर्यंत काचेचे व फायबरचे आच्छादन करतात, त्याच पध्दतीचे जोतिबा मंदिराला ऊन, वारा, पावसाच्या संरक्षणासाठी हे आच्छादन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेना शाखा जोतिबा यांच्या वतीने त्यांना जोतिबा मंदिरात दर्शन मंडप उभा करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे रमेश आमाणे, अनिल गेंडे, कुमार सांगळे, भारत भिवदर्णे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जोतिबा पत्रकार संघाच्या वतीने त्यांना श्री जोतिबाची प्रतिमा भेट देऊन आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा सत्कार केला. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, जयवंत शिंगे, आनंदा लादे उपस्थित होते.
स्त्रियांसाठी स्वतंत्र दर्शन रांग करा
By admin | Published: May 16, 2016 1:46 AM