कोल्हापूर : आनंदराव चौगले यांची आत्महत्या भाजपचे नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या धमकीमुळे झाली, असे म्हणणे हा बनाव असून, पाटील यांचा या आत्महत्येशी कोणताही संबंध नाही. पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी व महापालिका निवडणुकीतील पक्षाची विजयी घौडदौड थांबविण्यासाठी विरोधकांनी हा आरोप केल्याचे स्पष्टीकरण भाजपने केले आहे. जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, राहुल चिकोडे, संतोष भिवटे, अॅड. संपतराव पवार, मधुमती पावनगडकर, भारती जोशी यांच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. पत्रकात म्हटले आहे, ‘आत्महत्येची घटना गंभीर असून तिची उच्चस्तरीय चौकशी होण्याची गरज आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीशी आर. डी. पाटील यांचा कोणताही व्यवहार किंवा देणे-घेणे नव्हते. या व्यक्तीने पूर्वी कधीही आर. डी. यांच्याविरुद्ध तक्रार जाहीररीत्या किंवा पोलीस ठाण्यामध्ये केलेली नाही. त्यांच्यामध्ये वाद, भांडण अथवा पूर्ववैमनस्य नव्हते. चौगले यांची आत्महत्या उघड झाल्यानंतर काही क्षणांतच विरोधक तिथे जमले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोक आले. त्यामुळे चौगले यांच्या मृतदेहाजवळ मिळालेली चिठ्ठी ही त्यांनीच लिहिली आहे का, याबद्दल शंकेस वाव आहे. (प्रतिनिधी)
आर. डी. पाटील यांच्यामुळे आत्महत्या हा बनाव : भाजप
By admin | Published: November 01, 2015 1:18 AM