पाचगाव : आर. के.नगर परिसरातील मूळ सोसायटी आणि सोसायटी नंबर १ या परिसरात सोमवारी सकाळी नळाला चक्क अळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी आल्याने महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ऐन कोरोनाच्या महामारीत दूषित पाणी आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माणसं मेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
आर. के.नगर परिसराला अनेकवेळा अळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी मिळत आहे. तसेच एक-दोन दिवसआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील रहिवासी चांगलेच वैतागले आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे येथील रहिवाशांनी अनेकवेळा तक्रारी देखील केल्या आहेत. परंतु त्यांच्या तक्रारींकडे प्रशासन लक्षच देत नसल्याचे चित्र आहे. बिल वेळेत भरूनदेखील नागरिकांना अळीमिश्रित पाणी प्यावे लागत आहे. अनेकांनी घरात पाणी शुद्धीकरण यंत्र बसवले आहे, परंतु त्यातील पाण्यालाही दुर्गंधी येत आहे.
कोट :
आर. के.नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात अळ्या, जंतू असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी अनेकवेळा तक्रारी करून देखील याकडे संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. - सुदर्शन पाटील, रहिवासी, आर. के.नगर. सोसायटी नं. १
कोट :
अळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच घरामध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून देखील पाण्याला वास येतो. याकडे संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. - अनुपमा खटावणे, रहिवासी आर. के.नगर
फोटो : १९ आरके नगर पाणी
ओळ :
अनुपमा खटावणे यांच्या घरी आलेले अळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणी.