कोल्हापूर : राज्यातील गावागावांचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आर. आर. पाटील यांनी केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार घेणाऱ्यांबरोबरच अन्य गावांनीही हातात हात घालून आपली गावे सुंदर करावीत, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.जिल्हा परिषदेत मंगळवारी यड्रावकर यांच्याहस्ते आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या पिराचीवाडी (ता. कागल) आणि नरंदे (ता. हातकणंगले) या दोन गावांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वेळवट्टी, पिंपळगाव, लकिकट्टे, निवडे, करंबळी, मिणचे, संभापूर, बहिरेश्वर, मुगळी, वेखंडवाडी, कुंभारवाडी, कोतोली, शिवनाकवाडी या गावांना तालुक्यात पहिला क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रत्येकी १० लाखांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यड्रावकर म्हणाले, ज्या पध्दतीने आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास खात्याला दिशा दिली, तेच काम आमचे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ करत आहेत, याचा अभिमान आहे. शिरोळ तालुक्यात बिनविरोध ग्रामपंचायत केल्यास एक कोटीे रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही.
निवडणुकीपुरते राजकारण असावे. परंतु तेच डोक्यात ठेवून कारभार करू नका. शौचालये पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा परिषदेने जरी पुरस्कार घेतला असला, तरीही काही गावांच्या बाहेरची परिस्थिती पाहिल्यानंतर विदारक चित्र पाहावयास मिळते. अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या शब्दाखातर अजित पवार यांनी जिल्हा परिषदेला १० कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.अध्यक्ष बजरंग पाटील म्हणाले, मी २५ वर्षे गावचा सरपंच होतो. सरपंच हा सर्व व्यवस्थेचा कणा आहे. ग्रामस्थांची सेवा करण्याची भूमिका घेण्याची गरज आहे. यातून उद्याचे पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री घडणार आहेत.प्रास्ताविकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, केवळ पेव्हिंग ब्लॉक्स घातले आणि रस्ते चकचकीत केले म्हणून गाव सुंदर होणार नाही. गावातील पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवला पाहिजे. महिला आणि बालकांच्या कल्याणाच्या योजना आखल्या पाहिजेत.
आजरा तालुक्यातील मेंढोली गावच्या विकासासाठी मुंबईकरांनी जे सहकार्य केले आहे, ते उल्लेखनीय असल्याचे प्रशंसोद्गार चव्हाण यांनी काढले. यावेळी सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, अजयकुमार माने, रवी शिवदास, मनीषा देसाई, प्रियदर्शिनी मोरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यांच्यासह मान्यवर व सदस्य उपस्थित होते. यावेळी पिराचीवाडीचे सरपंच सुभाष भोसले, नरंदेचे सरपंच रवींदर अनुसे यांनी मनोगत व्यक्त केले.उपाध्यक्षाचे २०, तर अध्यक्षांकडून २६ लाखउपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आपल्या भाषणात पहिल्या आलेल्या पिराचीवाडीला १० लाखांचा निधी जाहीर केला. तेव्हा यड्रावकर यांनी अहो दुसऱ्याही गावाला निधी दिला पाहिजे, अशी सूचना केली. त्यानुसार पाटील यांनी २० लाख रुपये जाहीर केले. अध्यक्ष बजरंग पाटील यांनी त्याहीपुढे जात प्रत्येक तालुक्यात पहिल्या आलेल्या १३ गावांना प्रत्येकी २ लाख रुपये असा २६ लाखांचा निधी जाहीर केला.