कोल्हापूर : सोनाली चिमटे हिने पूर्वार्धात नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर ‘आर. आर. चॅलेंजर्स’ने ‘मल्टी वॉरियर्स’चा पराभव करीत कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली; तर जाधव इंडस्ट्रीज व छत्रपती शिवकन्या यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात आर. आर. चॅलेंजर्स संघाने मल्टी वॉरियर्सचा २-० असा पराभव केला. प्रारंभापासून आर. आर. संघाचेच वर्चस्व राहिले. त्यांच्याकडून प्रतीक्षा मिठारी, सोनाली चिमटे, अनुष्का खतकर, सोनाली साळवी, पूजा करमरकर, प्रियांका मोरे यांनी खोलवर चढाया केल्या. ‘आर. आर.’कडून सातव्या मिनिटाला प्रियांका मोरे हिच्या पासवर सोनाली चिमटे हिने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर मल्टी वॉरियर्सकडून अंजू तमंग, मिशल कास्थाना, सोनिया राणा, सुचिता पाटील, प्रणाली चव्हाण यांनी सामन्यात बरोबरी साधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आर. आर.च्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. उलट१३ व्या मिनिटाला पुन्हा मिळालेल्या संधीवर आर. आर.कडून सोनाली चिमटे हिने वैयक्तिक व संघाचा दुसरा गोल केला. उत्तरार्धात आघाडी कमी करण्याचे प्रयत्न मल्टी वॉरियर्सकडून, तर आघाडी वाढविण्याचे प्रयत्न आर. आर. चॅलेंजर्सकडून झाले. अखेरपर्यंत २-० अशी गोलसंख्या राखत सामना आर. आर. चॅलेंजर्सने जिंकला.
या सामन्यात आर. आर.च्या सोनाली चिमटे हिला ‘सामनावीर’ या बहुमानाने गौरविण्यात आले; तर लढवय्या खेळाडू म्हणून मल्टी चॅलेंजर्सच्या मुस्कान अत्तार हिचा सन्मान केला.
सत्रातील पहिल्या सामन्यात जाधव इंडस्ट्रीज व छत्रपती शिवकन्या यांच्यात झालेला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. जाधव इंडस्ट्रीजकडून गीता दास, लोको भूतिया, निशा, मृदल शिंदे, ऋतुजा सूर्यवंशी यांनी, तर छत्रपती शिवकन्याक डून प्यारी झाझा, सुस्मिता पिरधा, ऐश्वर्या हवालदार, समृद्धी कटकोळ, मृणाल खोत यांनी तोडीस तोड खेळ केला. मात्र, संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही.या सामन्यात मृदल शिंदे, प्यारी झाझा यांना ‘सामनावीर’ म्हणून संयुक्तरीत्या गौरविण्यात आले.आजचे सामनेदु. २ वाजता - आर. आर. चॅलेंजर्स विरुद्ध महाराष्ट्र क्वीनदु. ४ वाजता - मल्टी वॉरियर्स विरुद्ध जाधव इंडस्ट्रीज