कोल्हापूर : पेन्सिलीने रेखाटलेल्या रेषांतून मार्मिक विनोदांची निर्मिती करणारे आणि कॉमनद्वारे समाजातील विसंगती टिपणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी चित्रकार दत्तोबा दळवी यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने कोल्हापूरला भेट दिली होती. हा बहुधा त्यांचा पहिला आणि अखेरचा कोल्हापूर दौरा असावा. आर. कें.च्या मृत्यूनंतर त्यांच्या कोल्हापुरातील या स्मृतींना उजाळा मिळाला. कोल्हापूर स्कूल या चित्र-शिल्प परंपरेचा इतिहास दरबारी चित्रकार व शाहू महाराजांचे स्नेही दत्तोबा दळवी यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराजांच्या मृत्यूसमयीदेखील त्यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या दत्तोबांच्या स्मृतिदिनानिमित्त दळवीज् आर्टस्च्यावतीने त्यांनी काढलेल्या कार्टुन्स व पुस्तकांच्या मुखपृष्ठांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. दळवीज्च्या जुन्या इमारतीत २८ नोव्हेंबर १९९८ रोजी झालेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आर. के. लक्ष्मण यांच्या हस्ते झाले होते. कोल्हापूर स्कूल, दत्तोबा दळवी व जयसिंगराव यांच्या चित्रांचे त्यांनी भरभरून प्रशंसा करताना त्यांनी मी इच्छा असूनही आर्ट स्कूलमध्ये शिक्षण घेऊ शकलो नाही, याची खंत व्यक्त केली होती. जयसिंगराव दळवी यांच्या खास आग्रहावरून ते कोल्हापूरला आलेल्या लक्ष्मण यांनी दोन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी शाहू स्मारक भवनमध्ये कार्टून्सचे प्रात्यक्षिकही सादर केले होते. या कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर बहुधा ते कोल्हापूरला आले नाहीत. मात्र, या प्रदर्शनाच्या निमित्ताने एका थोर व्यंगचित्रकाराने कोल्हापूर स्कूल या चित्रपरंपरेतील एका महत्त्वाच्या दळवी या महत्त्वाच्या धाग्याला आपल्याही रेशीमगाठी जोडल्या होत्या. (प्रतिनिधी)
‘आर. कें.‘च्या कोल्हापूरशीही रेशीमगाठी
By admin | Published: January 28, 2015 12:49 AM