कोल्हापूर : रब्बी पेरणी हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला तरी अजून शेताच्या मशागतीचीच कामे सुरू असल्याने प्रत्यक्षात पेरणी होण्यास वेळ लागत आहे. त्यातच आता वीजजोडण्यांच्या अडथळ्यांमुळेही पेरणीवर मर्यादा येत आहेत. हंगाम पुढे सरकत असल्याने बागायती पट्ट्यात उसाच्या लागणीलाच प्राधान्य दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम होऊन यंदाचा रब्बीचा पेरा अजूनही ३४ टक्क्यांवरच अडकला आहे. गेल्या वर्षी आजअखेर ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. आतापर्यंत सांगलीत सर्वाधिक ३९ टक्के पेरण्या झाल्या असून सातारा दुसऱ्या, तर कोल्हापूर तिसºया क्रमांकावर आहे.
साधारणपणे सप्टेंबरच्या मध्यापासून रब्बी हंगामाची तयारी सुरू होते. आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक पेरण्या होतात; तर मागास पेरण्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केल्या जातात; पण यावर्षी परतीच्या पावसाने हे चक्रच बदलवून टाकले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पेरणी तर लांबचीच गोष्ट; शेतशिवारात पाऊलही ठेवता येत नव्हते, अशी परिस्थिती होती. या महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून पाऊस थांबल्याने मशागतीच्या कामांना सुरुवात झाली.
हंगामच पुढे सरकल्याने पेरणी करायची की नाही याबाबत स्वत: शेतकरीच साशंक दिसत आहे. पेरणी लांबली तरी पुढे मार्चमधील वादळी पावसात पिके अडकण्याचा धोका आहे. त्यामुळे अंदाज घेऊनच पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. आडसाल लागणी वाया गेल्याने रिकाम्या पडलेल्या शेतांमध्ये सध्या नव्याने ऊसलागण आटोपण्याची घाई उडाल्याचे चित्र आहे. या लावण क्षेत्रात रब्बीसाठी म्हणून हरभºयासह अन्य कडधान्ये पिकांची पेरणी करण्याकडे कल वाढला आहे.कोल्हापूर विभागात मोडणाºया कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत आजअखेर केवळ ३४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक ४५ टक्के पेरणी ज्वारीची झाली आहे. गव्हाच्या पेरणीकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून केवळ आठ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. मका २३ टक्के, हरभरा १५ टक्के, सूर्यफूल २० टक्के क्षेत्रांवर पेरणी झाल्याचे दिसत आहे.---------------------------------
- जिल्हा एकूण क्षेत्र पेरक्षेत्र टक्केवारी
- कोल्हापूर ४०,२९७ ४४४० ११
- सांगली २५१५०० ९७८२० ३९
- सातारा १४८२३ ७२०४४ ३४