राजाराम लोंढे - कोल्हापूर--परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोल्हापूर विभागात आॅक्टोबर मध्यापर्यंत तब्बल ३३ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. सातारा जिल्ह्यात रब्बी ज्वारीची ४१ टक्के, मक्याची ५१ टक्के, तर सांगलीमध्ये ज्वारीची तब्बल ५८ टक्के व मक्याची ५२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तुलनेने कोल्हापूर विभागात रब्बीच्या पेरणीने फारशी गती घेतलेली नाही. गत वर्षीच्या तुलनेत यंदा १५ ते २० टक्के रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. मान्सूनने पाठ फिरवल्याने यंदा खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे; पण परतीचा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी हंगामाकडे लागल्या आहेत. हा पाऊस सातारा जिल्ह्यात १५ दिवसांत सरासरीच्या १६५ टक्के, सांगली जिल्ह्यात १२७ टक्के, तर ८१ टक्के झाला. आॅक्टोबर ते डिसेंबर हा रब्बी पेरणीचा कालावधी असतो. कोल्हापूर विभागात साधारणत: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफुल व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. हातातोंडाला आलेली खरीप पिके गेल्याने ग्गेल्या १५ दिवसांत शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीचा धडाकाच लावला आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल असल्याने रब्बी उगवणीस पोषक आहे. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांत तिन्ही जिल्ह्यांतील विशेषत: सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीसाठी गती घेतली आहे.सातारा जिल्ह्यात ज्वारीची ४१ टक्के, मक्याची ५१ टक्के, तर सांगली जिल्ह्यात ज्वारीची ५८ टक्के, मक्याची ५२ टक्के, तर करडईची २७ टक्के पेरणी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारीची ८ टक्के, हरभराची ४ टक्के पेरणी झाली आहे. आठ दिवसांत पेरणीस गती येणार आहे. ज्वारी, हरभऱ्याचे क्षेत्र वाढणारयंदा पाण्याची टंचाई भासणार असल्याने कमी पाण्यावर येणारी रब्बी पिकेच घ्यावी लागणार आहेत. महिन्याभराच्या अंतराने दोनवेळा पाणी दिले तर हरभरा पीक येते; पण गव्हासाठी पाच ते सहावेळा पाणी द्यावे लागते. त्यातच यंदा थंडीचे प्रमाणही कमी राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र कमी होऊन हरभरा व ज्वारीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. आडसालीचे क्षेत्र घटलेगेल्या वर्षी कोल्हापूर विभागात ५३ हजार १३८ हेक्टरवर आडसाल उसाची लागण होती; पण यावर्षी ४१ हजार २७९ हेक्टर आहे. गत वर्षीपेक्षा ११ हजार ८५९ हेक्टरने आडसाल लागणीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे २०१६-१७ या हंगामात विभागातील उसाचे क्षेत्र घटणार हे निश्चित आहे.
कोल्हापूर विभागात रब्बीची पेरणी जोमात
By admin | Published: October 27, 2015 12:30 AM