संदीप आडनाईककोल्हापूर : रचित नरसिंघाणी या विद्यार्थ्याने स्वमग्नता आजारावर मात करून जलतरण स्पर्धेत मोठी झेप घेतली आहे. पुण्यात रविवारी पार पडलेल्या राज्यस्तरीय (निमंत्रित) ऑटिझम जलतरण स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांची कमाई करून रचितने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.‘स्वमग्नता’ अर्थात ‘ऑटिझम’ या स्थितीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, सध्या तीस मुलांमागे एक मूल स्वमग्न असल्याचे दिसून येते. जगभरात २ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑटिझम डे (स्वमग्नता दिन) म्हणून साजरा केला जातो. पालकांनी लक्ष दिले तर या आजारावर मात करता येते हे कोल्हापुरातील योजना नरसिंघाणी यांनी त्यांच्या मुलाबाबत सिद्ध करून दाखवले आहे.रविवारी पुण्यात पार पडलेल्या मेक माय ड्रीम फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय (निमंत्रित) ऑटिझम जलतरण स्पर्धेत १५ वर्षांवरील गटात रचितने ५० मीटर फ्री स्टाइल आणि ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये दोन सुवर्ण पदक पटकावले. त्याला प्रशिक्षक प्रभाकर डांगे, महेश पाटील आणि गोखले कॉलेजच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे यांचे प्रोत्साहन लाभले.
रचितचा प्रवास आश्चर्यकारक..१५ वर्षांच्या रचितचा प्रवास खूपच आश्चर्यकारक आहे. यात त्याची आई योजना नरसिंघाणी यांचा मोठा वाटा आहे. तो मोठा होत असताना बोलण्याला प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली, तेव्हा त्याला स्वमग्नता (ऑटिझम) असल्याचे समजले. मोठा होईल तसतसा तो खूप चंचल होत होता. तो बोलू शकणार नाही, असे सांगितले होते. पण, योजना यांनी त्याला बरे करण्यासाठी उपचाराचे नियोजन केले. तेव्हा ऑटिझमवर कोल्हापुरात उपचाराचे तंत्र विकसित झालेले नव्हती, म्हणून त्यांनी बाहेर जाऊन माहिती घेतली.
वॉटर थेरपीचा उपयोग..स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी सुरू केली. पण, आई म्हणून योजना यांनी त्याच्यासाठी चोवीस तास दिले होते. जगभरात या आजारावर काय उपचार आहेत, हे शोधून त्यांनी त्याचा आराखडा बनवला आणि थेरपीज सुरू केल्या, त्याला यश आले. वयाच्या सहा ते आठ वर्षानंतर तो थोडे बोलू लागला. त्याची हायपर ॲक्टिव्हिटी कमी होण्यासाठी त्याला वॉटर थेरपी दिली. त्यातूनच त्याच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. त्याला जलतरणाची आवड निर्माण झाली. आज त्याने या खेळात प्रावीण्य मिळविलेले आहे. अनेक बक्षिसेही मिळवलेली आहेत. या क्षेत्रातच तो करिअर करणार आहे.