कोल्हापूर : ग्रामीण विकासाला बळ मिळावे, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना प्रत्येकी एक गाव दत्तक घ्यावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत खासदार धनंजय महाडिक यांनी राजगोळी खुर्द (ता. चंदगड) हे गाव निवडले असून, त्यांनी त्याचे नाव केंद्र सरकारकडे पाठविले आहे. खासदार राजू शेट्टी हे शाहूवाडी तालुक्यातील गाव दत्तक घेणार असून, या गावाच्या निवडीचा निर्णय ते दोन दिवसांत घेणार आहेत.केंद्रात भाजप सरकार अस्तित्वात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकासाला हातभार लागावा, त्याला बळ मिळावे, या उद्देशाने भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या खासदारांना त्यांनी एक गाव दत्तक घ्यावे, असे आवाहन केले. त्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी राजगोळी खुर्द हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत खासदार महाडिक म्हणाले, राजगोळी खुर्दमध्ये शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राचा अभाव आहे. पायाभूत सुविधांची वानवा आहे. सुविधा असलेल्या गावाची दत्तक योजनेसाठी निवड केल्यास त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकास करता येत नाही. त्यामुळे गरज असलेल्या राजगोळी खुर्दची निवड केली. दत्तक घेण्यासाठी हे गाव निवडल्याचे पत्र गेल्या आठवड्यात केंद्र सरकारला पाठविले आहे. गाव दत्तक घेण्याचे निकष, दत्तक घेतल्यानंतर पुढे काय कार्यवाही करायची, याबाबत केंद्राच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी)माझ्या मतदारसंघातील मागास भाग शाहूवाडी तालुका हा आहे. त्यामुळे या तालुक्यातील कोणतेही एक गाव दत्तक घेण्याचे मी निश्चित केले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे मला त्याकडे लक्ष देता आले नाही. येत्या दोन दिवसांत दत्तक घ्यावयाच्या गावाचे नाव निश्चित करून ते केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. - खासदार राजू शेट्टी
दत्तक गावासाठी राजगोळी खुद
By admin | Published: November 05, 2014 12:27 AM