पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी दत्तात्रय पाटील हे कुडुत्री व कसबा तारळे येथे दत्त कृपा क्लिनिक असा फलक लावून बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपॅथीची पदवी आहे. त्यामुळे त्यांना रुग्णावर ॲलोपॅथी पद्धतीने उपचार करण्याचे अधिकार नाहीत. तरीही ते गेली अनेक वर्षे असा अनधिकृत व्यवसाय करत होते.
कुडुत्री येथील मनोहर चौगले व पिराजी आप्पा चौगले या पिता-पुत्रावरही त्यांनी २१ ते २६ एप्रिलदरम्यान उपचार केले. या दोघांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यादृष्टीने पुढील तपासणी व उपचार गरजेचे होते. तरीही या डॉक्टरने उपचार केले. त्यांची प्रकृती अस्वस्थ बनल्यानंतर आपल्या मर्जीतील कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे या दोघांचाही मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या दोघांना जीव गमवावा लागला, अशी तक्रार संबंधित कुटुंबीयांनी राधानगरी पोलीस, तहसील व आरोग्य विभागाकडे केली होती.