गौरव सांगावकर
राधानगरी (कोल्हापूर) : राधानगरी दाजीपूर फोंडा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. १ एप्रिल ते ३१ मे राधानगरी दाजीपूर मार्गवरील जुने पुल, रस्ते रुंदीकरण डांबरीकरण, मोऱ्या या कामांसाठी दोन महिन्याच्या कालावधीसाठी या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती. पण ज्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे तसे कोणतेही काम अद्याप दाजीपूर परिसरात चालू नसल्याचे निदर्शनात आल्याने काम चालू नाही तर रस्ता का बंद असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता.
रस्ता बंद असल्याने याचा व्यापारी वर्गावर परिणाम होऊ लागला. यामुळे व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी निदर्शने केल्यानंतर दि. १७ एप्रिल पासून राधानगरी दाजीपूर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णता खुला करण्यात आला आहे. अवाजड वाहने तसेच कोकण विभागातून येणाऱ्या सर्व वाहनासाठी मार्ग खुला करण्यात आला आहे. देवगड निप्पाणी कलादगी रा. मा १७८ मध्ये येणार दाजीपूर राधानगरी हा रस्ता राधानगरी अभयारण्य क्षेत्रातून जातो. भारतीय वन अधिनियम 1980 च्या तरतुदीनुसार वनक्षेत्रामध्ये काम करताना रीतसर परवानगी घेऊनच हे काम करण्यात यावे असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आत्ता रीतसर पारवानगी मिळ्यानंतर कामास सुरवात करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस. बी.इंगवले यांनी स्पष्ट केले.