संजय पारकर/ लोकमत न्यूज नेटवर्क
राधांनगरी : निपाणी ते देवगड या राज्य मार्गाच्या दुतर्फा रविवारी भरणारा राधानगरी आठवडी बाजार नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. पन्नास फूट रस्त्यावर बाजार भरत असून विक्रेत्यांमध्ये कमालीची बेशिस्त पाहावयास मिळते. त्यामुळे या राज्य मार्गावर नित्याची वाहतूक कोंडी असते.
राजर्षी शाहू महाराजांनी ११० वर्षांपूर्वी राधानगरीची बाजारपेठ वसवली आहे. परिसरातील पंचवीस-तीस गावांची बाजारपेठ असल्याने दूरदृष्टीतून शाहू महाराज यांनी ही बाजारपेठ वसवली आहे. प्रशस्त रस्ते, मोठे भूखंड अशी बाजाराची रचना आहे. २५० हून अधिक कायम व्यवसाय करणारे व्यापारी आहेत. भाजीपाला, फळे, कपडे, चप्पल, चिरमुरे, किरणामाल, पानपट्टी, नारळ, खाद्यपदार्थ आदी विविध वस्तूंची विक्री करणारे आठवडी बाजारात येतात. एक किलोमीटरपेक्षा अधिक लांब बाजारपेठ आहे. मात्र, राज्य मार्गावर वर्णे कोपरा ते बडदारे कोपरा या दीडशे मीटर अंतरातच बाजार भरला जातो. दाटीवाटीने येथच पाल मारून व्यापारी विक्रेते बसलेले असतात. काहींनी आपल्या दारात कायमस्वरूपी शेड मारून दुकाने थाटली आहेत.
कोल्हापूर-गोवा, निपाणी-कोकण यांना जोडणारा रस्ता असल्याने मोठमोठ्या अवजड वाहनांसह सर्वच प्रकारच्या वाहनांची सतत वर्दळ असते. त्यात सुटीचा दिवस असल्याने पर्यटकांची संख्याही मोठी असते. प्रवासी खरेदीसाठी रस्त्यातच वाहन थांबवतात. मोठे अवजड वाहन आले की कोंडी होते.
सकाळपासून सायंकाळपर्यंत बाजार असतो. वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर वादावादीचे प्रसंग घडतात. शिरोली मार्गावर वर्णे कोपरा ते मार्केट चौक या अरुंद मार्गावर पायी चालणेही मुश्कील होते. गर्दीमुळे मोबाइल, पाकीट मारण्याचे प्रकार घडतात. (उद्याच्या अंकात कुरुंदवाड बाजार)
हा होऊ शकतो पर्याय -
दुकानांसमोरील अतिक्रमणे काढून गटार, बाजूपट्टा व रस्ता याचा अंदाज घेऊन कायमस्वरूपी पट्टे मारून द्यायला हवेत. तिथेच बसण्याची सक्ती करावी, त्याबाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांवर ग्रामपंचायतीने थेट दंडात्मक कारवाई केली तरच बाजाराला शिस्त लागू शकते.
कोट-
येथील बाजारपेठ प्रशस्त आहे. मात्र, रस्ता व बाजू पट्ट्या यातील असमतोलपणामुळे अडचणी उद्भवतात. ग्रामपंचायतीच्या वतीने व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागा आखून देण्यात येत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर कायमस्वरूपी उपायोजना करण्यात येणार आहे.
- कविता शेट्टी, सरपंच राधानगरी
फोटो ओळी : राधानगरी आठवडी बाजारामुळे निपाणी ते देवगड या राज्य मार्गावर अशी काेंडी होते. (फोटो-२६०२२०२१-कोल-राधानगरी)