कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मक्का प्रक्रिया (स्टार्च) कारखाना १० वर्षांपूर्वी अगदी चांगला चालला होता. तीन शिफ्टमध्ये काम सुरू होते. मात्र निव्वळ वर्किंग कॅपिटल भांडवल लागणारा पैसा कमी पडल्याने कारखाना बंद झाला. त्यासाठी लागणाऱ्या पैशांची उपलब्धता करून हा कारखाना परत सुरू करावा, अशी मागणी करून स्टार्च कारखान्यासाठी ठिकपुर्ली आणि घोटवडे या परिसरातील ४० एकर जागा नाममात्र किमतीत त्यावेळी घेतली होती. तिची किंमत आता कोट्यवधी झाली आहे. जिल्हा बँकेकडून अर्थसाहाय्य सहा कोटी रुपये उचल केली होती, त्याचे हप्तेदेखील वेळेवर सुरू होते. मात्र मक्काखरेदीसाठी भांडवल कमी पडू लागले. त्याची वेळेत उपलब्धता होऊ न शकल्याने कारखाना बंद पडला. बंद पडलेल्या कालावधीत के.डी.सी.सी. बँकेवर असणाऱ्या प्रशासकांनी कारखान्याची विक्री करून दुसऱ्याला ताबा देण्याचे काम केले.
कारखान्याकडे असणाऱ्या स्थावर मालमत्तेचा विचार केला असता बँकेची कुठल्याही पद्धतीची कर्ज पूर्ण भागवता आली असती. मात्र चुकीचा व्यवहार करून प्रशासकांनी बँकेचा कर्जाचा बोजा आहे तसाच ठेवला. बँकेच्या या निर्णयाला तत्कालीन संचालक मंडळाने विरोध केला होता. मात्र प्रशासकांनी यांना दाद दिली नाही. सदर व्यवहारातील रक्कमदेखील शासनाकडे अथवा बँकेकडे भरली गेली नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर बाजीराव चौगले, बळवंत चौगले, गणपती चौगले, बाजीराव चौगले, आनंदा चौगले, गणेश चौगले, नंदकुमार चौगले, बाळासो डोंगळे, आप्पा डोंगळे, सजना पाटील, आदी कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.