संजय पारकर ।राधानगरी : राधानगरी तालुक्यातील ११६ गावांसाठी महसूल विभागाचे ३८ सज्जे आहेत. मात्र, यासाठी ३0 तलाठी आहेत. यातील आठ पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत, तर दोन तलाठी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे या गावांचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या तलाठी यांना मूळ कामकाज पाहत हे काम पाहावे लागत असल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे.
तर लोकांनाही वेळेत आपली कामे होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. आॅनलाईनसात-बारा यासह वाढलेले प्रचंड काम व यासाठी वरिष्ठ अधिकाºयांचा असलेला रेटा यामुळे सुखाची नोकरी म्हणून तलाठी झालेल्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
महसूल विभागाचा गाव पातळीवरील महत्त्वाचा दुवा म्हणून तलाठ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. जमिनीच्या नोंदी असलेली सर्व कागदपत्रे हाताळणे, त्यातील फेरबदलाच्या नोंदी करणे, यासाठी असलेला शासनाचा कर वसूल करणे हे त्यांचे महत्त्वाचे काम असते. लोकांना घरबसल्या आपल्या जमिनीचे कागद पाहता यावेत यासाठी हे सर्व आॅनलाईन करण्याचे काम मागील पाच-सहा वर्षे सुरू होते. यासाठी मूलभूत गरज असलेले संगणक व इंटरनेट यांची पुरेशी उपलब्धता हे मोठे आव्हान होते. यासह असंख्य अडचणींना तोंड देत हे काम कसेतरी पूर्ण झाले आहे. मात्र, यात अजूनही अनेक त्रुट्या आहेत.
बदलत्या स्थितीत तलाठ्यांचे कामाचे स्वरूप बदलले आहे. शासनाने त्यांच्यावर अनेक जबाबदाºया लादल्या आहेत. एका सज्जात दोन ते आठ गावांचा समावेश असतो. शासनाच्या अनेक योजना व लोकांच्या कामासाठी तलाठ्यांचा दाखला आवश्यक असतो. अशावेळी इतक्या गावांचा कारभार पाहणाºया तलाठ्यांना शोधणे हे दिव्य असते. उतारे, दाखले आॅनलाईन द्यावे लागतात. मात्र, बीएसएनएलच्या इंटरनेटचा कमी वेग, वारंवार होणारा सर्व्हर डाऊन याचा व्यत्यय असतो. त्यामुळे दिवस-दिवस प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यात एकाही तलाठ्याला स्वतंत्र कार्यालय नाही. असलेल्या जागेत लाईट, इंटरनेट असेलच याचा भरवसा नाही.काही मंडल कार्यालयांसाठी निधी मंजूर झाला आहे; पण जागेचा पत्ता नाही. राधानगरीत असलेल्या मंडल कार्यालयाची इमारत दोन वर्षांपूर्वी पावसाने पडली आहे.पिरळ, कौलव येथील तलाठी दीर्घ रजेवरसरवडे, सावर्डे पाठणकर, सोन्याची शिरोली, सिरसे, शिरगाव, बांबर्डे येथील तलाठी पदे रिक्त आहेत. तर पिरळ व कौलव येथील तलाठी दीर्घ रजेवर आहेत. सहापैकी एक मंडल अधिकारी पद रिक्त आहे. तालुक्यात ९८ ग्रामपंचायती, ११६ गावे, दोन लाखांच्या पुढे लोकसंख्या व ८९ हजार २३२ हेक्टर जमीन आहे. ४० हाजारांच्या पुढे कुटुंबे आहेत. तलाठ्यांना प्रत्येक सज्जात कार्यालय व अन्य सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे. यामुळे त्यांना सुरळीतपणे काम करता येईल व लोकांचीही कामे वेळेत होऊन त्यांना होणारा मनस्ताप कमी होईल.