राधानगरी : आज दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत तालुक्याला झोडपून काढले. गेल्या दोन दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. तर बांगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमीदाबाच्या पट्यामुळे अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. तर वादळामुळे बाजारपेठेतील अनेक दुकानांच्या छप्परावर झाडे पडून नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आंबा तसेच काजू पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.राधानगरी सह शिरोली, कुडूत्री, पिरळ, तारळे, फेजिवडे, पडळी या गावांना ही पावसाचा मोठा फटका बसला. परिसरातील अनेक झाडे उकमळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.मागील शनिवारी (दि.१९) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा मिळाला. मात्र पिकांना याचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसापासून सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने राधानगरीला झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 7:09 PM