कोल्हापूर : पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगाने वाहणाऱ्या एका मुळीचा समाजमाध्यमांवर प्रसारित होणारा एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. यासोबत आलेल्या संदेशाप्रमाणे, त्यातील वस्तू ही हिमालयातील "गरुडवेल" ची मुळी आहे, तर काहींनी ही "खंडूचका"ची मुळी आहे असे म्हटले आहे. ही मुळी भौतिकशास्त्रातील नियमांचे उल्लंघन करुन, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगाने वाहते, ही एक अदभुत किमया आहे असा संदेश पसरवला जात आहे, मात्र ही वनस्पतींची मुळी नाही, शिवाय प्रवाहाविरुध्द वाहण्याची क्रिया ही भौतिकशास्त्रातील नियमांप्रमाणेच घडते आहे, त्यामुळे तो चमत्कार नाही, असे मत ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी व्यक्त केले आहे.याबाबत डॉ. बाचूळकर म्हणाले, यासंदर्भातील व्हिडिओ मला कांहीजणांनी पाठविला असून शहानिशा करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार या व्हिडिओत दाखविलेली वस्तू ही वनस्पतींची मुळी नाही, असे माझी शास्त्रीय प्रतिक्रिया आहे. कोणत्याही वनस्पतींची मुळी सरपिल आकाराची नसते. गुळवेल या औषधी वनस्पतींस गरुडवेल म्हणतात. अजान वृक्ष आणि भांडिर या झुडपास खंडूचका म्हणतात.
पण या तिन्हीचीही मुळे सरपिल आकाराची वेटोळी नसतात. गारंबी, पहाडवेल, ओंबळी यासारख्या या मोठ्या, लाकडी वेलवर्गीय वनस्पतीं असून त्यांची खोडे व फांद्या व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे सरपिल आकाराची असतात. यामुळे ही वस्तू या वेलींचे खोड किंवा फांदी आहे, हे सुस्पष्ट आहे. ही वस्तू वाहत्या पाण्यात सोडल्यानंतर, वाहत्या पाण्याचा प्रवाह तिच्या सरपिल, वेटोळया भागावर आदळून त्याठिकाणी चक्राकार वेगवान गती निर्माण होते, त्यामुळे ही वस्तू प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करुन, वेगाने जाऊ लागते.
प्रवाहाच्या विरुध्द दिशेने वाहण्याची सर्व क्रिया भौतिकशास्त्रातील नियमांप्रमाणेच घडून येते. हे शास्त्रीय सत्य आहे. व्हिडिओत दाखवलेली ही घटना अदभुत किमया किंवा चमत्कार वगैरे काही नाही, हे लक्षात घ्यावे. याच आकाराची व वजनाची ॲल्युमिनियम किंवा प्लॅस्टिकची वस्तू तयार करून वाहत्या पाण्यात सोडले तर, ती वस्तूही अशीच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते. यामुळे ही फक्त ठराविक वनस्पतींचीच किमया नाही हे लक्षात येते. -डॉ. मधुकर बाचूळकर. कोल्हापूर.