कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील वसतिगृहात शुक्रवारी मध्यरात्री मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर रॅगिंगचा प्रयत्न झाला. रॅगिंगला नकार दिल्याने परप्रांतीय विद्यार्थ्यांनी त्याला शनिवारी सकाळी बेदम मारहाण करून जखमी केले. जयंत रमेश तोंडे (वय २०, रा. मूळ गाव पाथर्डी, अहमदनगर) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वसतिगृहाच्या खानावळीमध्ये नाष्टा करण्यासाठी गेल्यानंतर ही मारहाण करण्यात आली. या रॅगिंग प्रकरणामुळे महाविद्यालयीन प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा चौघांना अटक करण्यात आली आहे. जखमी तोंडे याने महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये संशयित रुपेंद्रसिंग, सुमित रॉय, राहुल मीना, राहुल चाजोर्निया, जितेंद्र वर्मा, निनाद भालेराव, हेमंत चव्हाण आदींनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. अॅन्टी रॅगिंग कमिटीच्या निर्णयानुसार या संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जयंत तोंडे हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस.च्या दुसऱ्या वर्षात शिकतो. त्याच्या वडिलांनी त्याला नवीन पल्सर मोटारसायकल घेतल्याने ती देण्यासाठी त्याचा मित्र अंकित खेडकर हा शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात आला होता. त्यानंतर जयंत हा मध्यरात्री बाराच्या सुमारास शेंडा पार्क येथील वसतिगृहाच्या बाहेर मोबाईलचा टॉर्च लावून मोटारसायकल धूत होता. यावेळी बाजूलाच एम. बी. बी. एस.च्या तिसऱ्या वर्षांत शिकणारे सात परप्रांतीय विद्यार्थी शेकोटी पेटवून मद्यप्राशन करीत बसले होते. यावेळी त्यांनी जयंतला मोबाईलचा टॉर्च बंद करण्यास सांगितला. त्यानंतर त्याला बोलवून रँगिग करण्याचा प्रयत्न केला. त्यास नकार देताच त्याला शिवीगाळ करुन जळत्या लाकडाने मारहाण केली. यावेळी त्याचे मित्र आल्याने त्यांनी उद्या, तुला बघून घेतो अशी धमकी देऊन निघून गेले. जयंत हा शनिवारी सकाळी आठच्या सुमारास नाष्टा करण्यासाठी वसतिगृहाच्या खानावळीमध्ये गेला. याठिकाणी ते परप्रांतीय विद्यार्थी बसून होते. त्याला पाहताच त्यांनी पुन्हा बोलावून घेत रँगिग करण्याचा प्रयत्न केला. या भीतीने तो वसतिगृहात पळून गेला. काही वेळाने जयंतचे मित्र विवेक साखळकर, मयुरेश घाणे, कृ ष्णा रंनखांबे, श्रीकृष्ण चौधरी, महारुद्र सानप हे जाब विचारण्यासाठी खानावळीमध्ये आले. याठिकाणी त्या परप्रांतीय विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वादावादी केली. त्यामुळे दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये एकमेकाच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्याने जयंतच्या तोंडावर वर्मी घाव लागून तो गंभीर जखमी झाला. त्याचे मित्र कृ ष्णा रनखांबे व अंकित खेडकर हे देखील किरकोळ जखमी झाले. या हाणामारीमुळे वसतिगृह व खानावळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनी जखमी जयंतला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) दाखल केले. विद्यार्थ्यांचे क्लासबंद आंदोलन दरम्यान, या प्रकाराची माहिती समजताच महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी वसतिगृहास भेट देऊन रेक्टर डॉ. राऊत व डॉ. विजय कस्सा यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी सीपीआरमध्ये येऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी पहिल्या वर्षात शिकणाऱ्या सुमारे १४० विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता रामानंद यांची भेट घेतली. यावेळी जोपर्यंत दोषींवर सक्त कारवाई होत नाही, तोपर्यंत क्लासमध्ये एकही विद्यार्थी बसणार नाही, अशी भूमिका घेत निवेदन दिले. अनेक विद्यार्थ्यांचे रँगिग शेंडा पार्क येथील वसतिगृहात ४८ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये एम. बी. बी. एस.च्या पहिल्या ते तिसऱ्या वर्षांत शिकणारे विद्यार्थी राहतात. तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिला व दूसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘सर’ म्हणून बोलविले पाहिजे. ते सीनिअर असल्याने त्यांच्या समोरून जाताना मान खाली घालूनचं जायचे. त्यांनी सांगितलेली कामे करायची, असा अलिखित नियम या वसतिगृहात अनेक वर्षांपासून चालत आहे. यापूर्वी अनेक विद्यार्थी रँगिगला बळी पडले आहेत. तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृहामध्ये प्रचंड दहशत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार करण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. भीतीपोटी विद्यार्थी तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. रमेश तोंडे यांनी घेतली रामानंद यांची भेट जयंत तोंडे याच्यावर रॅगिंग झाल्याचे समजताच शनिवारी रात्री या मुलाचे वडील रमेश तोंडे यांच्यासह नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी तोंडे यांनी अधिष्ठाता यांच्याशी या विषयावर चर्चा केली. शेंडा पार्क येथील या प्रकाराबद्दल महाविद्यालयाचे रेक्टर यांना तोंडे यांनी सुनावले असल्याची चर्चा यावेळी दालनाबाहेर सुरू होती. त्यानंतर पोलिसांनी रमेश तोंडे यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर रात्री पंचनामा सुरू केला. रात्री उशिरापर्यंत डॉ. रामानंद यांची रॅगिंग कमिटीतील सदस्यांबरोबर याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत अजून चर्चा सुरू असल्याचे सांगितले. गुन्हा दाखल; चौघांना अटक जयंत तोंडे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संशयित रूपेंद्रसिंग, राहुल मीना, सुमित रॉय व राहुल जाजोरिया (सर्व राहणार कर्मचारी निवासस्थान, शेंडा पार्क, कोल्हापूर) या चौघांवर राजारामपुरी पोलिसांत शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद महाविद्यालयातील डॉ. विजय दिगंबर कसा (वय ३९, रा. विश्वदीप अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी दिली. रात्री उशिरा या चौघांना अटक करण्यात आली. सीपीआरमध्ये या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
मेडिकलच्या विद्यार्थ्यावर रॅगिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2015 1:15 AM