कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज, गुरुवारी भारतीय जवान किसान पार्टीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे या मतदारसंघात आता पंचरंगी लढतीचे चित्र आहे. पाटील यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह उमेदवारी दाखल केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. रघुनाथ पाटील म्हणाले, मतदारसंघातील जवान व शेतकरी बरोबर असल्याने मला कोणाचे आव्हान वाटत नाही. राजू शेट्टी व साखर कारखानदारांनी मिळून शेतकऱ्यांचे नुकसान केले असून खासदार धैर्यशील माने हे पाच वर्षे कुठे होते, हे जनताच विचारत आहेत. सत्यजित पाटील-सरुडकर यांचे वडील आमदार होते. त्यामुळे मीच खरा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पोपटराव दाते, डॉ. प्रगती चव्हाण, ॲड. माणिक शिंदे, ज्योतिराम घोडके व विजय पाटील उपस्थित होते.
शेट्टी, माने, पाटील यांचे अर्ज दाखलवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी.सी. पाटील यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर महायुतीचे धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१५) शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला होता. तसेच राजू शेट्टी यांनीही सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत बैलगाडीतून जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील - सरूडकर यांनी मंगळवारी (दि.१६) साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला.