कोल्हापूर : आशियाई क्रीडा स्पर्धेची चँम्पियन नेमबाज राही सरनोबत हिने सोमवारी डॉ. करणीसिंग शूटिंग रेंजवर ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी चँम्पियनशिपच्या अखेरच्या दिवशी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून विजयाची हॅट्रीक साधली. तर अनुष्का पाटील हिने सांघिक युवा गटात १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.नवी दिल्लीतील करणीसिंग शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत सोळा राज्यांतून ४९९ मुलींनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत सोमवारी आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर दुसरी कोल्हापूरकर अनुष्काने शर्वरी भोईर व जानवी देशमुख यांच्या साथीने महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. स्पर्धेत १६८३ गुण तिने मिळविले. अनुष्का गोखले कॉलेजमध्ये शिकत असून, तिला डॉ. चंद्रशेखर साखरे, नवनाथ फडतरे, युवराज साळोखे, विनय पाटील, युवराज चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.ज्युनियर विश्वविजेती दिल्लीची १४ वर्षाची नाम्या कपूर ३१ गुणांसह रौप्यची मानकरी ठरली. दहा मीटरची राष्ट्रीय चँम्पियन मनू भाकरला २७ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा : राहीची राष्ट्रीय विजेतेपदाची हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 11:14 AM