शिवाजी सावंत।गारगोटी : गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी आमदार प्रकाश आबिटकर गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. युवानेते राहुल देसाई आणि माजी आमदार के. पी. पाटील गटाच्या आघाडीने सरपंचपदासह १२ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याने त्यांच्या गटात उत्साहाचे वारे आहे.
सत्ताधारी आघाडीतील विद्यमान चार सदस्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या विजयाने राहुल देसाई गटात चैतन्य पसरले आहे. भाजपचे सरपंच संदेश भोपळे विजयी झाल्याने उपसरपंचपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या उमेदवाराची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीने भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे स्थान बळकट झाले आहे.
गारगोटी शहरातील निवडणूक सुरुवातीपासूनच गाजत होती. सरपंचपदासाठी मागासवर्गीय प्रवर्ग आरक्षित झाल्याने कोण उमेदवार द्यायचा इथंपासून झालेली सुरुवात माघारीच्या दिवशी तीन वाजेपर्यंत अनिश्चित होती. संदेश भोपळे आणि राजेंद्र घोडके यांच्या उमेदवारी शेवटच्या क्षणी निश्चित करण्यात आल्या आहेत. संदेश भोपळे यांच्या पत्नी गायत्री भोपळे या पंचायत समितीच्या सदस्या आहेत. पं. स.च्या माध्यमातून संदेश भोपळे यांचा लोकसंपर्क चांगला आहे. तर राजेंद्र घोडके हे व्यावसायिक असल्याने तुलनेने त्यांचा संपर्क कमी पडला आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यापासून संदेश भोपळे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राहुल देसाई यांनी तगडी मोर्चेबांधणी केली होती. काही झाले तरी यावेळी आमदार
आबिटकर गटाला सत्तेपासून थोपवायचे म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली. राहुल देसाई यांच्या गटापेक्षा तुलनेने माजी आमदार के. पी. पाटील यांचा गट कमीआहे; परंतु यावेळी राहुल देसाई यांच्यासोबत युती करून गतवेळीपेक्षा तीन जागा जादा मिळविल्या. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान भक्कम होत आहे.1 गारगोटी शहरातील विविध प्रकारच्या विकासासाठी अनेक प्रकारचे निधी उपलब्ध करून आमदार आबिटकर यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला असल्याचा दावा करीत त्यांच्या गटाने ही निवडणूक लढविली. अंतर्गत रस्ते, गटर्स, पथ दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, नानानानी पार्क यासारख्या अनेक कामांची पूर्तता केली आहे. याशिवाय एकछत्री अंमल ठेवीत आणि विरोधकांना विश्वासात घेऊन काम केले होते; पण या निवडणुकीत मतदारांनी विकासकामांकडे कानाडोळा करीत राहुल देसाई यांच्या आघाडीला पसंती दिली आहे. त्यामुळेच राहुल देसाई यांची जबाबदारी वाढली आहे.2 मतदारांनी विद्यमान सरपंच सरिता चिले, उपसरपंच अरुण शिंदे, रूपाली राऊत, विजय आबिटकर या विद्यमान सदस्यांना नाकारले आहे. विजय आबिटकर आणि अरुण शिंदे यांचा पराभव जिव्हारी लागणारा आहे. तर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अलकेश कांदळकर यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला.3 गारगोटी शहरात वाढते अतिक्रमण आणि रहदारी यांसारख्या समस्यांचे निराकरण होणे आवश्यक आहे. राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भाजपला या ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश मिळाला आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. याशिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून खऱ्या अर्थाने गारगोटीचा विकास होईल, असे काम करण्याची जबाबदारी राहुल देसाई यांच्यावर आली आहे.