कोल्हापूर : लोकसहभागातून पोकलॅन मशीन व जेसीबीच्या साहाय्याने बुधवारी रंकाळ्यातील गाळ उपसा करण्यात आला. या कामास नगरसेवक राहुल माने यांनी एक पोकलॅन मशीन व गुजरी येथील गुजरी सराफ व्यावसायिक संग्राम साळोखे यांनी एक जे. सी. बी. मशीन उपलब्ध करून दिले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला.रंकाळा तलावाची पूर्व बाजू, क्रशर चौक, पक्षी निरीक्षण केंद्र व संध्यामठ परिसरात गाळ काढण्यात आला; तसेच स्वच्छता करण्यात आली. सकाळी सात वाजल्यापासून महापालिकेच्या यंत्रणेद्वारे तसेच स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते व नागरिक यांच्या सहभागातून संध्यामठ, तांबट कमान व पक्षी निरीक्षण केंद्र येथील परिसर स्वच्छता करण्यात आली. यावेळी या मोहिमेध्ये लहान मुलांनीही आपला सहभाग नोंदविला. यावेळी मोहिमेत बुधवारी १३ डंपर गाळ व एक डंपर प्लास्टिक कचरा काढण्यात आला.सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता रमेश मस्कर, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे, दिलीप पोवार, आर्किटेक्ट इंजिनिअरचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासह ८० कर्मचारी, अधिकारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.