एक उच्चविद्याविभूषित आणि भरगच्च असा राजकीय वारसा असूनही त्याचे प्रदर्शन कोठेही न करता, समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेऊन प्रतिक्रिया देणारा त्यांचा संयमी स्वभाव सर्वांना आपलासा करुन घेणारा आहे. अनेक परदेशी उच्चशिक्षण घेतलेले तरुण परदेशातच किंवा पुण्या - मुंबईत स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतात. पण ‘आपली माती आणि आपली माणसं’ डोळ्यासमोर ठेवून राहुल पाटील यांनी ग्रामीण भागात काम करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केला. त्या निर्णयाचे आज सोने झाले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेने माजी खासदार बाळासाहेब माने यांच्यासारखे लोकनेते या जिल्ह्याला दिलेले आहेत. त्यामुळे राहुल पाटील यांची कारकीर्द ही जिल्ह्याच्या व माझ्या जडणघडणीत आणि विकासात भर घालणारी असेल, हा विश्वास माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला आहे. राहुल पाटील यांच्या उज्ज्वल राजकीय वाटचालीला मनस्वी शुभेच्छा !
- अश्विनी धोत्रे,
माजी सभापती, करवीर पंचायत समिती